राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हे आमचे लक्ष्य नाही
रॉबर्ट वड्रा यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ इंदोर
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या प्रियांका वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी पंतप्रधान कुणीही व्हावा, परंतु देश धर्मनिरपेक्ष आणि एकजूट रहायला हवा, लोकशाही कायम रहावी आणि निवडणूक निष्पक्ष व्हावी असे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत की नको यासंबंधी आमची लढाई नाही. बिहारमध्ये मतपत्रिकेने पुन्हा निवडणूक करविण्यात आली तर निकाल बदलेल असे वड्रा यांनी मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये बोलताना म्हटले आहे.
लोकांदरम्यान राहून आलेल्या अनुभवातून मी ईव्हीएमविषयी बोलत आहे. जर आम्ही मतपत्रिकेने निवडणूक घेतली तर निकाल निश्चितच वेगळा लागेल. पुन्हा मतदान होणार नाही हे मला ठाऊक आहे. आता ज्या ठिकाणी निवडणूक होणार आहे, तेथे भाजप, निवडणूक आयोग आणि यंत्रणा पुढील निवडणुकीची तयारी करतील असे रॉबर्ट वड्रा यांनी म्हटले आहे.
अशाप्रकारचे सरकार काही निवडक लोकांनाच लाभ मिळवून देईल. सर्व बंदरे, विमानतळे सर्वठिकाणी अदानी-अदानी दिसून येत आहे. किती पैसा खर्च केला जातोय याचे उत्तरदायित्व असायला हवे असे वड्रा यांनी म्हटले आहे
आमची लढाई लोकशाहीसाठी आहे. लोकशाहीसाठी, देशाच्या लोकांसाठी, देशहितासाठी आम्ही लढत राहू. राहुल गांधी पंतप्रधान होतील की नाही हा आमचा उद्देश नाही. देशाला धर्मनिरपेक्ष अन् एकजूट ठेवणे आमचे लक्ष्य आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून काँग्रेसने लोकशाहीच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला असल्याचा दावा वड्रा यांनी केला आहे.