देश आपला............... अंतराळ क्षेत्र
भारताची जगद्विख्यात अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने चालू वर्षभरात अनेक यशस्वी प्रक्षेपणे करत अंतराळ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली चमक सिद्ध केली. ‘बाहुबली’च्या माध्यमातून अवकाशझेप घेताना इस्रोने इतर देशांचे उपग्रहही सुखरुपपणे अंतराळात प्रस्थापित केले आहेत. आता नुकताच अमेरिकेचा तब्बल 6 हजार 100 किलोग्रॅम वजनाचा ‘ब्ल्यूबर्ड ब्लॉक-2’ उपग्रह अवकाशात पोहोचवत इतिहासही रचला आहे. अशाच काही निवडक उ•ाणांचा घेतलेला आढावा...
29 जानेवारी
इस्रोचा ‘शतकोत्सव’
‘इस्रो’ने 29 जानेवारी रोजी आपले 100 वे प्रक्षेपण करत ‘शतकोत्सव’ साजरा केला. या ‘शतकी’ प्रक्षेपणाच्या माध्यमातून 2 हजार 250 किलोग्रॅम वजनाचा एनव्हीएस-02 हा संचार उपग्रह अवकाशात प्रस्थापित करण्यात आला. या उपग्रहाचे अवकाश आयुष्यमान 12 वर्षे इतके असेल. या उपग्रहाचा उपयोग दूरसंचार आणि इतर महत्त्वाच्या सुविधांसाठी होणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लाँच पॅडवरून बुधवार, 29 जानेवारी रोजी सकाळी 6:23 वाजता जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँचिंग व्हेईकलने उ•ाण केले. हे इस्रोचे 100 वे प्रक्षेपण अभियान ठरले. एनव्हीएस-02 या नावाचा हा उपग्रह इस्रोच्या नव्या पिढीतील उपग्रहांपैकी दुसरा आहे. त्याची निर्मिती पूर्णत: स्वदेशी आहे. या उपग्रहाची तरंगक्षमता एल 1 श्रेणीतील असून ही श्रेणी अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग व्यवस्थेत उपयोगात आणली जाते. जीएसएलव्ही-एफ15 वाहनावरून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. अवघ्या 19 मिनिटांमध्ये हा उपग्रह अवकाशात 36 हजार 577 किलोमीटर अंतरावरील कक्षेत प्रस्थापित करण्यात आला.
25 जून
अॅक्सिओम’ची अंतराळात यशस्वी झेप
शुभांशू शुक्ला ठरला 41 वर्षांमधील पहिला भारतीय अंतराळवीर
‘अॅक्सिओम-4’ अंतराळ अभियान चारवेळा पुढे ढकलल्यानंतर अखेर यशस्वी ठरले. या यानाने 25 जून रोजी दुपारी अंतराळात यशस्वी झेप घेतली. परिणामी, या यानातील भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला, गेल्या 41 वर्षांमधील पहिला भारतीय अंतराळवीर ठरला. ‘अॅक्सिओम-4’ या अंतराळ यानात शुभांशू शुक्लासह ज्येष्ठ अंतराळवीर पेगी व्हिटसन (अमेरिका), स्लावोत्झ उझनान्स्की (पोलंड) आणि तिबोर कापू (हंगेरी) हे अन्य तीन अंतराळवीर होते. त्यांच्यापैकी उझनान्स्की हे इंजिनिअर असून कापू हे अंतराळ संशोधक होते. या यानाचे प्रक्षेपण अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनेडी अंतराळ केंद्रावरून करण्यात आले. खासगी कंपनी स्पेस एक्स च्या ‘फाल्कन 9’ या अग्निबाणाच्या साहाय्याने या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
30 जुलै
‘निसार’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
घनदाट जंगल व अंधारातही दृश्ये टिपण्याची क्षमता
निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करत भारताने अंतराळाच्या क्षेत्रात आणखी एक मोठी कामगिरी नोंदवली. पृथ्वीचे अवलोकन करणारा उपग्रह ‘नासा-इस्रो सिंथटिक अपर्चर रडार’ म्हणजेच ‘निसार’ला जीएसएलव्ही-एस-16 रॉकेटद्वारे बुधवार, 30 जुलै रोजी अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले. निसार हा जगातील पहिला रडार उपग्रह असून तो अवकाशातून पृथ्वीचे नियोजनबद्ध पद्धतीने नकाशे तयार करणार आहे. या मोहिमेचा कालावधी 5 वर्षे आहे. हा उपग्रह भारत, अमेरिकेसह पूर्ण जगासाठी उपयुक्त ठरणार आहे. आतापर्यंतचा सर्वात महागडा आणि सर्वात शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रह म्हणून ‘निसार’ची ओळख आहे. या मोहिमेवर 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 12,500 कोटी रुपये खर्च करण्यात आले. ‘निसार’ची निर्मिती इस्रो आणि नासा यांनी संयुक्तपणे केली आहे. ‘निसार’चे वजन 2,392 किलोग्रॅम असून हा उपग्रह पृथ्वीचे अवलोकन करणार आहे.
2 नोव्हेंबर
‘बाहुबली’मधून ‘सीएमएस-03’ची भरारी

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचा (इस्रो) चार हजार किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाचा संप्रेषण उपग्रह ‘सीएमएस-03’ प्रक्षेपित करत उत्तुंग झेप घेतली. रविवार, 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:26 वाजता बाहुबली रॉकेटद्वारे 4,410 किलो वजनाचा ‘सीएमएस-03’ हा संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. भारतीय भूमीवरून भू-समकालिक हस्तांतरण कक्षेमध्ये (जीटीओ) प्रक्षेपित केलेला आतापर्यंतचा हा सर्वात वजनदार उपग्रह ठरला. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे नौदलाची संप्रेषण क्षमता आणखी मजबूत होणार आहे. नौदलासाठी विकसित केलेल्या ‘सीएमएस-03’ उपग्रहाच्या उ•ाणासाठी भारताचे प्रसिद्ध प्रक्षेपण वाहन ‘एलव्हीएम3-एम5’ने भरारी घेतली. हे उ•ाण ‘एलव्हीएम3-एम5’ म्हणून ओळखले जाईल. या उ•ाणाद्वारे भारताचा सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रह ‘सीएमएस-03’ अवकाशात पोहोचला.
24 डिसेंबर
सर्वात वजनदार उपग्रह अंतराळात
इस्रोकडून इतिहास, उपग्रहाचे वजन 6,100 किलो
अवकाशात झेपावलेल्या उपग्रहाचे नाव ‘ब्ल्यूबर्ड ब्लॉक-2’
अमेरिकास्थित ‘एएसटी स्पेसमोबाईल’ कंपनीची निर्मिती
वर्षअखेरीस म्हणजेच 24 डिसेंबर 2025 रोजी भारतीय अवशकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने 6 हजार 100 किलो वजनाच्या उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करुन नवा इतिहास निर्माण केला. इस्रोच्या ‘बाहुबली’ अग्नीबाणाच्या साहाय्याने हे प्रक्षेपण बुधवारी सकाळी 8 वाजून 55 मिनिटे 30 सेकंदांनी इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून करण्यात आले. या उपग्रहाचे नाव ‘ब्ल्यूबर्ड ब्लॉक-2’ असे होते. इस्रोने आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांमध्ये हा सर्वाधिक वजनाचा आहे. हा उपग्रह दूरसंचार सेवेसाठी असून तो निम्नकक्षेत परिभ्रमण करणारा सर्वात वजनदार उपग्रह आहे. या उपग्रहाची निर्मिती अमेरिकास्थित ‘एएसटी स्पेसमोबाईल’ या खासगी कंपनीने केली आहे. इस्रोच्या ‘एलव्हीएम 3-एम 6’ या अग्नीबाणाने या उपग्रहाला त्याच्या पूर्वनिर्धारित कक्षेत सुस्थिर केले आहे.
13 जानेवारी
‘झेड-मोड’ भुयारी मार्गाचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग भुयारी प्रकल्पाचे म्हणजेच ‘झेड-मोड’ बोगद्याचे लोकार्पण केले. या भुयारी मार्गामुळे सोनमर्ग परिसर वर्षभर पर्यटनासाठी खुला ठेवण्याचा उद्देश साध्य झाला आहे. हा प्रकल्प प्रादेशिक विकास आणि कनेक्टिव्हिटीमधील एक ऐतिहासिक पाऊल मानला जातो. ‘झेड-मोड’ बोगद्याचे महत्त्व केवळ सामान्य नागरिक आणि पर्यटकांपुरते मर्यादित नाही तर ते सैनिकांच्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी देखील महत्त्वाचे आहे. श्रीनगर-लेह दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग-1 वर बांधण्यात आलेला ‘झेड-मोड’ भुयारी मार्ग गगनगीर ते सोनमर्ग पर्यंत पसरलेला असून त्याची लांबी 6.5 किमी आहे. या बोगद्याचे नाव ‘झेड-मोड’वरून पडले आहे.
5 डिसेंबर
इंडिगोची विमानसेवा विस्कळीत
कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे 400 हून अधिक उड्डाणांवर परिणाम

डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी इंडिगोची विमानसेवा कोलमडल्याने त्याचे परिणाम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसून आले. नवीन विमान वाहतूक सुरक्षा नियमांमुळे देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागला. याचा इंडिगोच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सर्व विमान कंपन्यांसाठी वैमानिक आणि इतर क्रू सदस्यांसाठी सुरक्षा नियमांमध्ये सुधारणा केल्या होत्या. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशभर इंडिगोच्या विमानसेवेचा बोजवारा उडाला होता.
शिवकालीन 12 गड-किल्ले ‘युनेस्को’च्या वारसा यादीत
भारतातर्फे ‘मराठा लष्करी भूप्रदेश’अशी ओळख
केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने राजे शिव छत्रपतींच्या 12 गड-किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये स्थान मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी भारत सरकारने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (श्aratप्a श्ग्त्ग्tarब् थ्aह्म्aेज द घ्ह्ग्a) या संकल्पनेअंतर्गत नामांकन प्रस्ताव सादर केला होता. या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश होता. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी भारतातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या गड-किल्ल्यासंबंधी वास्तूला स्थान मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात होते.
26 सप्टेंबर
अलविदा ‘मिग-21’
भारतीय हवाई दलाचे वर्षानुवर्षे एक बलस्थान असलेले मिग-21 लढाऊ विमान 26 सप्टेंबर 2025 रोजी निवृत्त झाले. चंदीगड येथे एका समारंभात ही घोषणा करण्यात आली. 62 वर्षे भारताच्या हवाई सीमांचे रक्षण करणाऱ्या मिग-21 लढाऊ विमानाला शुक्रवारी अंतिम सलामी देण्यात आली. याप्रसंगी हवाई दल प्रमुखांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना ‘फॉर्म 700 लॉगबुक’ रजिस्टर सादर केले. सदर रजिस्टर बुक लढाऊ विमानाच्या सेवेचा अंतिम शिक्का मानला जातो. त्यानंतर तो हवाई दलाच्या वारशाचा एक भाग बनतो. मिग-21 च्या निरोपानंतर आता लढाऊ विमानांची कमतरता भरून काढण्यासाठी एलसीए तेजस एमके1, एमके2 आणि राफेल लढाऊ विमानांचा एक नवीन स्क्वॉड्रन हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चंदीगडमध्ये आयोजित मुख्य निरोप समारंभात मिग-21 ला वॉटर कॅनन सलामी देण्यात आली.