आमची युती निजदसोबत; लैंगिक शोषण करणाऱ्यांशी नव्हे!
हुबळीतील प्रचारसभेत गृहमंत्री अमित शहा यांचे स्पष्टीकरण
बेंगळूर : लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही निजदसोबत युती केली आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांशी नव्हे. प्रज्ज्वल रेवण्णा यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या कारवाईला आम्ही पाठिंबा देऊ, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. हुबळी येथे बुधवारी आयोजित भाजपच्या सभेत ते बोलत होते. प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या चित्रफितींचे पेनड्राईव्ह प्रकरण युती केल्यानंतर बाहेर आले आहे. महिलांचे शोषण करणाऱ्यांना आम्ही संरक्षण देत नाही. राज्यात काँग्रेसचे सरकार असून कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. प्रज्ज्वल यांना विदेशात का जाऊ दिले? अशा प्रकरणातही काँग्रेस राजकारण करत आहे. जर तुम्ही राज्यातील महिलांचे रक्षण करू शकत नसाल, तर आम्ही कर्नाटक सुरक्षित ठेवू, असे म्हणत अमित शहा यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर टीका केली.
काँग्रेस पक्षाला आधीच माहिती होती!
प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या कथित लैंगिक शोषणाच्या आरोपाबद्दल काँग्रेस पक्षाला अगोदरच माहिती होती. कर्नाटकातील प्रबळ वक्कलिग पट्ट्यातील मतदानानंतर या चित्रफिती व्हायरल करण्यात आल्या. आपल्या राजकीय गणितानुसार 26 एप्रिल रोजी राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होईपर्यंत कारवाईसाठी काँग्रेस सरकार वाट पाहत होते. आरोपी विदेशात जाण्यास कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गृहमंत्री परमेश्वर हेच जबाबदार आहेत, असा आरोपही अमित शहा यांनी केला.