पाण्यासाठी वन्यजीवांची वानवा आता थांबणार !
ओतूर (पुणे)
पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात यंदा कडक ऊन्हाची चाहूल आत्तापासूनच लागायला सुरुवात झाली आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे अंगाची लाही- लाही होत आहे. ओतूर वन विभागांतर्गत येणाऱ्या जंगलातील पाण्याचे सर्व स्त्रोत आटत चालले आहेत. त्यामुळे वनक्षेत्रातर्फे निर्मिती करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यांची साफसफाई करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अशी माहिती, ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ व वनपाल सारिका बुट्टे यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले, अशा परिस्थितीमुळे अन्न- पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्त्यांचा आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ओतूर वनक्षेत्रात बिबट्या, हरिण, सांबर, तरस, वानर, रानडुक्करे, ससे, मोर, लांडोर असे अनेकविध जातीचे पशू-पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सद्यःस्थितीत जंगलातील ओढे, नाले, तसेच नैसर्गिक पाणवठे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अनेक वन्यजीवांची जंगलातील आपला मुक्काम हलविताना मानवी वस्त्यांचा आधार घेत असल्याचे दिसत आहे. स्थलांतरित होत असताना हेच वन्यजीव अन्न-पाण्याच्या शोधात महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत अपघती मृत्यूलाही सामोरे जातात. अशा अपघाती घटना टाळण्यासाठी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वन्य प्राण्यांची विशेष काळजी घेण्याचीही गरज आहे.
अशातच ओतूरच्या वनहद्दीत वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी वन विभागाने विशेष काळजी घेण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत खामुंडी येथे कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. येत्या काही दिवसात या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पुरेसे पाणी भरले जाईल. याशिवाय प्रत्येक पाणवठ्यावर देखरेखीसाठी वनकर्मचारीची नेमणुक केली जाणार असल्याचेही वन विभागाने सांगितले.