...अन्यथा आत्मदहन करणार
महेश कुबल यांचा इशारा : पाडलोस मध्ये महावितरण अधिकारी व ग्राहकांची बैठक
न्हावेली / वार्ताहर
पाडलोस, न्हावेली, दांडेली, आरोस भागात जुनाट विद्युत वाहिन्या झुडपातून जात धोकादायक स्थितीत आहेत. सडलेल्या खांबमुळे हानी होण्याची शक्यता आहे. परिसरात लाईनमन फिरतच नसल्याने ग्राहकांना विजेअभावी राहावे लागते. आरोस, दांडेली मध्ये अद्याप वायरमन नाही. सर्व समस्या तात्काळ मार्गी न लावल्यास किंवा कोणतीही हानी झाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल यांनी दिला आहे.
पाडलोस रवळनाथ मंदिर येथे न्हावेली, दांडेली, आरोस, पाडलोस गावातील वीज ग्राहकांची व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक पार पडली. यावेळी सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता समाधान चव्हाण, बांदा कनिष्ठ सहाय्यक अभियंता अनिल यादव, लाईनमन श्री. जांभळे, वायरमन उमेश कोरगावकर, पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजू शेटकर, आरोस सरपंच शंकर नाईक, दांडेली सरपंच निलेश आरोलकर यांसह वीज ग्राहक आनंद गावडे, नंदू परब, विश्वंबर नाईक, भाई देऊलकर, कृष्णा माणगावकर, संदीप माणगावकर, ओमकार नाईक, राजू माधव, सचिन कोरगावकर, बाबी परब, विजय गावडे, बाबल परब, बंड्या माधव, समीर नाईक, रावजी पार्सेकर, अमित नाईक, बाळा नाईक, विजय नाईक, अनंत नाईक, गौरेश पटेकर, अमोल नाईक, भाई शेटये, रवी गावडे, सत्यवान नाईक यांसह ग्राहक मोठ्या संख्येने समस्या मांडण्यासाठी उपस्थित होते.
न्हावेली-रेवटेवाडी येथे विद्युत खांबाला स्टे मारून एक वर्ष झाले परंतु अजूनही धोकादायक खांब बदललेला नाही. अधिकारी तसेच वायरमन यांना फोन केला असता ते नेहमी 11 केव्ही लाईनवर काम सुरू असल्याचे सांगत रावजी पार्सेकर आक्रमक बनले. दांडेली सरपंच निलेश आरोलकर यांनी मळेवाड लाईनवरून पर्याय व्यवस्था म्हणून तात्काळ विद्युत पुरवठा सुरू करा असे निर्देश दिले. वायरमन श्री. जांभळे येताच सर्व संतप्त ग्राहकांनी टाळ्या वाजवून रोष व्यक्त करत स्वागत केले. यावेळी अधिकारीच आपल्याला कर्मचारी देत सांगताच ग्राहक आक्रमक झाले व सुरू असलेला सावळागोंधळ बंद करण्याचा इशारा दिला. किंवा तिन्ही गावचे एक महिन्याचे वीज बिल माफ करा आम्ही सर्व लाईन मोकळी करतो असे सांगितले. दरम्यान उपअभियंता समाधान चव्हाण यांनी सांगितले की, मळेवाड फिडर वरून होणारा विद्युत पुरवठा सात खांब टाकल्यानंतर सुरू होईल. तसेच जीर्ण झालेल्या वाहिन्या, विद्युत खांब बदलण्यात येईल. वाहिन्यांवरील झुडपेही हटविणार असून यापुढे ग्राहकांना वीज समस्या उद्भवणार नसल्याचे सांगितले.