...अन्यथा यंदाची चतुर्थी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर
अखिल गोवा बसमालक संघटनेचा इशारा
पणजी : राज्यातील खाजगी बसमालकांचे दीर्घकालीन प्रलंबित प्रश्न आणि मागण्या त्वरित सोडविण्यात याव्या, अशी मागणी अखिल गोवा बसमालक संघटनेने केली आहे. येत्या चतुर्थीपूर्वी या मागण्या मान्य न झाल्यास सर्व बसमालक चतुर्थीकाळात मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बसतील, असा इशारा संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी दिला आहे. मंगळवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 2019 पासून या मागण्या प्रलंबित आहेत. प्रत्येक चतुर्थी, दिवाळीला या मागण्या पूर्ण होतील अशी आशा आम्ही बाळगून असतो. परंतु प्रत्येकवेळी केवळ निराशाच पदरी पडते. यंदा हा प्रकार सहन करून घेणार नाही. चतुर्थीपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास दि. 7 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर येऊन बसणार,असा इशारा ताम्हणकर यांनी दिला आहे. यासंबंधी सरकारला निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रती मुख्यमंत्री, वाहतूकमंत्री, मुख्य सचिव, वाहतूक संचालक, वाहतूक सचिव यांना सादर करण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने वाहतूक संचालकपदी स्वच्छ, निर्मळ, बिनभ्रष्टाचारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, आणि तो अधिकारी पूर्णवेळ असावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अधिसूचनेमुळे खासगी बस व्यवसाय धोक्यात
केंद्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेनुसार इलेक्ट्रिक, इथेनॉल, मेन्थोल आदी इंधनावर चालणाऱ्या बसेसना परमीटची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. मात्र या अधिसूचनेमुळे गोव्यासह देशभरातील खाजगी बस मालकांचा व्यावसाय धोक्यात आला आहे. या अधिसूचनेचा आधार घेत उद्या कुणीही 400-500 बसेस खरेदी करेल व विनापरमीट कुठेही चालवेल अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे. त्यामुळे या अधिसूचनेतून गोवा राज्य वगळावे, अशी मागणी केल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले. त्याशिवाय व्यावसायिक वाहनांचे फिटनेस संपल्यानंतर त्यांना प्रतिदिन दंडऊपी आकारण्यात येणारे 50 ऊपये माफ करावे, विमा हप्त्यात अनुदान, इंधनावर अनुदान, जुनी बस बदलण्याची योजना चालू करावी, ’म्हजी बस’ योजना त्वरित बंद करून त्याऐवजी 3 ऊपये प्रमाणे देण्यात येणारे इंधन अनुदान देण्यात यावे, आदी मागण्याही संघटनेतर्फे करण्यात आल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.