अन्यथा औषध फवारणी ठरू शकते जीवघेणी
योग्य ती खबरदारी घ्या : कृषी खात्याचे आवाहन
बेळगाव : मागील आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन फवारणी करावी अन्यथा दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. रताळी, बटाटा, भुईमूग आणि मका पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक औषधाची फवारणी केली जात आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे.
जिल्ह्यात 7.40 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी 95 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना पुरेसे वातावरण निर्माण झाले आहे. तर काही पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. अशा पिकांवर विविध औषधांची फवारणी केली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांनी मास्क आणि इतर साधनांचा वापर करावा आणि योग्य ती काळजी घ्यावी. यापूर्वी औषधाची आणि तणनाशकाची फवारणी करताना शेतकऱ्यांना जीवाला मुकावे लागले आहे.
खरीप हंगामात ऊस, भात, भुईमूग, सोयाबिन, मका, ज्वारी, कापूस, रताळी, बटाटा आदी पिकांची पेरणी आणि लागवड करण्यात आली आहे. सद्यपरिस्थितीत पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पिकांमध्ये तणनाशक, टॉनिक आणि इतर औषधांच्या फवारणीला वेग आला आहे. सर्वत्र औषध फवारणी करून किडीचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अशावेळी शेतकरी तोंडाला व नाकाला काही सुरक्षा न घेताच फवारणी करत असतात. त्यामुळे धोका उद्भवू शकतो. शेतकऱ्यांनी औषध फवारणीसाठी योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्लादेखील कृषी खात्याने दिला आहे.