अन्यथा पोलीस स्थानकांना घेराव घालणार
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचा इशारा : एफआयआर दाखल करणे बंद करावे
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर : एसआयआर फॉर्म-7 प्रकरणात राज्य सरकारने भाजप कार्यकर्त्यांविऊद्ध एफआयआर दाखल करण्याचे सुरूच ठेवल्यास भाजपच्यावतीने पोलीस स्थानके आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी दिला. भाजप राज्य कोअर कमिटीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे नवनियुक्त सहप्रभारी कासम वेंकटेश्वरलू यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
एसआयआर फॉर्म-7 प्रकरणात काँग्रेस सरकारने संभ्रम निर्माण केला असून भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. या प्रकरणात राज्य उच्च न्यायालयानेही सरकारला फटकारले आहे. राज्य सरकारने कायमस्वरुपी निवासी प्रमाणपत्र (पीआरसी) देण्याचे अधिकार पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) आणि नगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. हा निर्णय योग्य नसल्याचे सांगत हे अधिकार केवळ तहसीलदार आणि त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच द्यावेत. सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा. तसेच यासंदर्भात निवडणूक आयोगालाही पत्राद्वारे माहिती देण्याबाबत कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी पोटनिवडणुकीत निजदला विश्वासात घेऊन भाजपचा उमेदवार रिंगणात उतरविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुका कोणतेही कारण पुढे करून पुढे ढकलू नयेत. सरकारने या निवडणुकांसाठी आरक्षणाचा तपशील जाहीर केला असून निवडणुका वेळेत घेण्यासाठी भाजपने तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही विजयेंद्र यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रभारी नियुक्त करणे आणि निवडणुकीच्या नियोजनासाठी तातडीने जिल्हास्तरीय व्यवस्थापन समित्या स्थापन करणे, असे निर्णय कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आले. तसेच कोअर कमिटीमध्ये आणखी काही सदस्यांचा समावेश करण्याबाबत पक्षातील नेत्यांचे एकमत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राष्ट्रीय अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिला असून योग्य वेळी अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही विजयेंद्र यांनी स्पष्ट केले.
