Kolhapur : अन्यथा दूध उत्पादक जनवारांसह गोकुळवर भव्य मोर्चा !
गोकुळच्या डिबेंचर कपातीविरोधात दूध उत्पादकांचा उद्या मोर्चा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळने दूध संस्थांकडुन कपात केलेली डिसेंबरची रक्कम तत्काळ परत करावी, अन्यथा उद्या १६ रोजी गाय, म्हैस जनावरांसह शासकीय विश्रामगृह येथून गोकुळवर दूध उत्पादक भव्य मोर्चा काढतील, असा इशारा प्राथमिक दूध संस्था चालकांनी पत्रकार परिषदेत दिला. तसेच दूध संस्थांची डिबेंचरची रक्कम परत देऊन गोकूळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी ही यावेळी संस्थाचालकांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना संस्थाचालक प्रमोद पाटील म्हणाले, गोकुळने केलेली डिबेंचर कपात अन्यायकारक आहे. प्राथमिक दूध संस्थांना विश्वासात न घेता गोकुळने परस्पर निर्णय घेतला. गोकुळच्या वार्षिक सभेत विषय पत्रिकेवर विषय न मांडता, ठराब न करता, सहकार खात्याची परवानगी न घेता परस्पर डिबेंचर कपात करणे चुकीचे आहे. नियमांना बगल देऊन डिबेंचर कपात केल्याच्या कारणावरून गोकुळवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. संचालक मंडळ ही बरखास्त होऊ शकते.
प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादकांच्यावरती अन्याय करणारा हा निर्णय गोकुळ प्रशासनाने मागे घेऊन कपात केलेली रक्कम परत करावी. कपात केलेली रक्कम चालू आर्थिक वर्षात परत करणे शक्य नसेल तर दूध फरक रक्कम बाढवून द्यावी अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली.
भाजप किसान मोर्चाचे भगवान काटे म्हणाले, गोकुळने केलेल्या डिबेंचर कपात विरोधात काढण्यात येणारा मोर्चा हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. यानंतरही गोकुळ प्रशासनाने डिबेंचरची रक्कम परत न केल्यास न्यायालयीन लढाई करण्याचीही तयारी केली असल्याचे काटे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दूध संस्थाचालक युवराज पाटील, बाबासो साळोखे, सर्जेराव धनवडे, शशिकांत कोराणे, प्रताप पाटील आदी उपस्थित होते.
संचालिका शौमिका महाडिक करणार नेतृत्त्व
गोकुळने दूध संस्थांच्या दूध दर फरकातून कपात केलेल्या डिबेंचर रक्कमेच्या विरोधात उद्या १६ रोजी सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृह येथून गोकुळवर दूध संस्थाचालक, उत्पादक यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक करणार आहेत. दूध संस्थाचालकांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर शाहूपुरी येथील कार्यालयात संचालिका महाडिक यांची भेट घेतली. त्यांना मोर्चाचे नेतृत्व करण्याबाबत विनंती केली. त्यानुसार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.