For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओटवणेत गव्यांच्या कळपांचा भातशेतीत धुडगूस; शेतकऱ्यांची झोप उडाली; वन विभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

03:21 PM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
ओटवणेत गव्यांच्या कळपांचा भातशेतीत धुडगूस  शेतकऱ्यांची झोप उडाली  वन विभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी
Advertisement

ओटवणे : ओटवणे परिसरात गव्यांच्या कळपांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, सध्या या कळपांनी लावणी केलेल्या भातशेतीला लक्ष्य केले आहे. गव्यांचे कळप भातलावणी खाऊन फस्त करण्याबरोबरच उर्वरित पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन विभागाने तातडीने उपाययोजना करून गव्यांच्या कळपांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी अंकुश नाईक आणि नागेश गावकर यांनी केली आहे.

Advertisement

सह्याद्री पट्ट्यात गव्यांच्या कळपांचा उपद्रव वर्षभर सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भात बियाणे पेरल्यानंतर सुरुवातीला गव्यांचे कळप तरव्याला लक्ष्य करतात. त्यानंतर भातलावणी झाल्यापासून भातकापणीपर्यंत या कळपांचा शेतीत वावर सुरूच असतो. भातकापणीनंतरही वायगणी भातशेती तसेच उन्हाळी भाजीपाला पिकांमध्ये गव्यांकडून नुकसान केले जाते.

सध्या भातलावणीचा हंगाम सुरू असताना गव्यांचे कळप शेतांमध्ये घुसून लावणी खाऊन फस्त करीत आहेत.  उर्वरित लावणीमध्ये धुडगूस घालून मोठ्या प्रमाणात नासधूस करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, गव्यांच्या भीतीमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

Advertisement

गव्यांना भातशेतीपासून दूर ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना करून पाहिल्या; मात्र त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वन विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन गव्यांच्या कळपांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.