For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेते विरुद्ध जनता यात ठरले "ओमराजे"अव्वल

01:52 PM Jun 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
नेते विरुद्ध जनता यात ठरले  ओमराजे अव्वल
Omraje Nimbalkar
Advertisement

महादेव पाटील उमरगा

उस्मानाबाद लोकसभेच्या २०२४च्या निवडणुकीत एकीकडे महायुतीच्या बाजूने नेतेमंडळींची फौज कागदावर मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. तर महाविकास आघाडीकडे ओमराजे व आ. कैलास पाटील सहकारी पक्षांना घेऊन निवडणुकीत उतरले होते. पण कागदावरील फौजवर जनतेचे मतरुपी मतदानमध्ये ओमराजे विक्रमी मतांनी अव्वल ठरले आहेत.

Advertisement

उस्मानाबाद मतदारसंघ हा मराठवाड्यातील एक मागासलेला मतदारसंघ आहे. मागील ३० वर्षांच्या काळात प्रत्येक निवडणुकीत नवीन खासदार निवडून येत होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात घडलेल्या अनेक घटना या उस्मानाबाद लोकसभेवर परिणाम करणाऱ्या घडत होत्या. तसेच फेब्रुवारीपासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले होते. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून शेवटच्या क्षणापर्यंत कलह चालू होता. तर दुसरीकडे ओमराजे यांनी त्या काळात मतदारसंघ दोनदा पिंजून काढले होते. त्यामुळे प्रचारात ओमराजे यांची आघाडी होती. मागील पाच वर्षांत केंद्रातील विरोधक तर अडीच वर्षे राज्यातील सत्ताधारी म्हणून अनुभव घेतला आहे. या काळात त्यांनी सामान्यांची कामे एका फोनवर केल्याचा दावा केला. प्रचंड जनसंपर्क तयार केला. कोणाचेही फोन टाळले नाहीत. या निवडणुकीत हाच मुद्दा सर्वाधिक ऐरणीवर घेतला गेला होता. त्यामुळे जनसंपर्क, फोन कॉल, केलेली कामे ओमराजे यांना विजय संपादन करण्यात महत्त्वपूर्ण ठरली. अल्पसंख्याक समुदायाचे मतदान ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने शेवटच्या क्षणी एकतर्फी झुकल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे मराठा, लिंगायत यांच्या प्रश्नासाठी लोकसभेत उठवलेल्या आवाजामुळे मतदार त्यांच्या बाजूने झुकल्याचे दिसून येत आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ही निष्ठावंतची लढाई आहे, असा प्रचार करण्यात आला होता. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच ओमराजे निंबाळकर यांनी मोठी आघाडी घेतली होती. गेल्या लोकसभेपेक्षा मतांचा टक्का वाढला. हा मतांचा टक्का निंबाळकरांच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आता रंगली आहे.

महायुतीकडून अर्चना पाटील यांच्यासाठी समीकरणे जुळवताना पदाधिकारी मोदींचा अंडरकरंट अग्रस्थानी कार्यकर्ते ठेवत होते. आमदार पती राणा जगजितसिंह पाटील भाजप आणि अर्चना पाटील राष्ट्रवादी यामुळे महायुतीला मानणारा वर्ग नाराज होता. त्याचप्रमाणे मतदारात पाटील घराण्यासंदर्भात चीड निर्माण झाली होती. लोकसभा निवडणुकीत उतरण्याची तुळजापूरचे भाजप आ. राणाजगजितसिंह पाटील यांची तयारी नव्हती. मात्र, ऐनवेळी पक्षाचे निर्देश आल्यास तयारी असायला हवी म्हणून शेवटच्या टप्प्यात काहीशी तयारी केली. मात्र, तडजोडीत त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाली. तसे पाहिल्यास पुरेसा वेळ मिळालेला नव्हता. तरीही कमी वेळेत त्यांनी चांगला जोर लावला. इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये त्यांचा हातखंडा असतानाही त्यात काही प्रमाणात त्रुटीमुळे ते यशस्वी झाले नाही. अनेक दिवस सर्व महायुतीतील नेत्यांची गाठीभेटी व मनधरणी करण्यात गेल्यामुळे प्रचारात कमी दिवस असतानाही त्यांना कमी दिवस भेटले.

Advertisement

महायुतीच्या आमदारांची रसद आणि पंतप –धान नरेंद्र मोदींचा करिश्मा यावर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांची भिस्त होती. सभा, प्रचार रॅली यांच्या माध्यमातून महायुतीने कुठलीही कसर सोडली नव्हती. ज्या, तालुक्यांमधून अर्चना पाटील यांना मोठा विजय मिळण्याची उमेद होती, तिथे मात्र त्यांची फसगत झाल्याचं चित्र दिसलं आहे. त्यांचे पती राणाजगजितसिंह पाटील यांच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातही त्यांना मताधिक्य मिळाले नाही. आठ आमदार त्यांच्या बाजूने असतानाही त्यांच्या भागातही अनेकांच्या तरी त्यांच्या गावात ही लीड मिळाला नाही. एकंदरीत जनतेशी असलेला थेट संवाद, राज्यात पक्ष फुटीच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीची लाट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या बाजूने मतदारसंघात होती.

माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून अनेकापर्यंत जिव्हाळा
जनतेने आपला फोन खासदाराने उचलला हे माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून अनेकापर्यंत जिव्हाळा निर्माण केला. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होत तीन लाखांपेक्षा अधिक मताने ओमराजे निंबाळकर अब्बल ठरले. मागील ३० वर्षांच्या काळात कुठलाच खासदार दुसऱ्यांदा निवडून आलेला नसतानाही ओमराजे निवडून आलेले आहेत.

Advertisement
Tags :

.