For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उस्मानाबाद - लातूर - बीड मतदारसंघात ९९ % मतदान, २२ जून रोजी मतमोजणी

09:59 PM Jun 18, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
उस्मानाबाद   लातूर   बीड मतदारसंघात ९९   मतदान  २२ जून रोजी मतमोजणी
Advertisement

| त. भा. संवाद प्रतिनिधी, धाराशिव

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात गुरुवारी झालेल्या निवडणुकीत ९९ टक्के मतदान झाले आहे. ९८८ पैकी ९८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. धाराशिय, लातूर आणि बीड या तीन जिल्ह्यातील २९ मतदान केंद्रांवर आज शांततेत आणि सुरळीत मतदान झाले. २२ जून रोजी या मतांची धाराशिव येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली आहे.

Advertisement

भारतीय जनता पक्ष महायुतीकडून माजी मंत्री बसवराज पाटील आणि काँग्रेसकडून महाविकास आघाडीचे महेश देशमुख यांच्यात दुरंगी लढत असलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काहीसा अल्प प्रतिसाद दिसून आला.

धाराशिव : येथे मतदानासाठी जाताना मतदार. सकाळी दहा वाजेपर्यंत मतदारांची या मतदान केंद्राकडे रिघ वाढताना दिसली. दुपारी बारा वाजेपर्यंत या मतदारसंघात ९८८ पैकी ५२४ मतदारांनी म्हणजेच ५३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Advertisement

  • २२ जून रोजी मतांची धाराशिव येथे मतमोजणी

  • मतमोजणीची तयारी पूर्ण

दुपारी बारा वाजेपर्यंत बीड जिल्ह्यातील शिरूर कासार, आष्टी, पाटोदा, परळी आणि लातूर जिल्ह्यातील उदगीर इथल्या मतदान केंद्रावर ५३ पैकी ५३ म्हणजे १०० टक्के मतदान झाले होते. तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील मतदान केंद्रावर शून्य टक्के मतदान झाले होते.

दुपारी चार वाजेपर्यंत या मतदानाचा वेग वाढला. बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, वडवणी, बीड, शिरूर कासार, आष्टी, पाटोदा, धारूर, परळी, अंबाजोगाई, केज, रेणापूर या केंद्रावर तर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, जळकोट, चाकूर, उदगीर, शिरूर अनंतपाळ, देवणी, औसा, निलंगा आणि धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, लोहारा, उमरगा, कळंब, वाशी, भूम, परंडा या सर्व मतदारसंघात शंभर टक्के मतदान झाले आहे.

Advertisement

.