ओसाका, मुचोव्हा, गॉफ, पेगुला, जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत
बेलारुसची साबालेंका, झेकची क्रेसिकोव्हा, रशियाचा सैफुलीन पराभूत
वृत्तसंस्था, लंडन
2026 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेतील दुसऱ्या आठवड्याला सोमवारी प्रारंभ झाल्यानंतर महिलांच्या विभागात बेलारुसची टॉपसिडेड आर्यना साबालेंकाला जपानच्या ओसाकाने पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या विभागात अमेरिकेची कोको गॉफ आणि जेसिका पेगुला तसेच दहावी मानांकीत कॅरोलिना मुचोव्हा यांनी शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले आहे. क्रेसिकोव्हाचे आव्हान चौथ्या फेरीत समाप्त झाले. पुरूषांच्या विभागात सर्बियाच्या माजी टॉपसिडेड जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे.
महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाने बेलारुसच्या टॉपसिडेड साबालेंकाचा 6-2, 7-6 (7-2) अशा सरळ सेटमध्ये फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरी पहिल्यांदाच गाठली आहे. या सामन्यात ओसाकाच्या वेगवान सर्विसने तसेच जमिनी लगतच्या फोरहॅन्ड फटक्याने साबालेंकाला चांगलेच दमविले. यापूर्वी साबालेंकाने तीनवेळा ओसाकाला पराभूत केले होते.
दुसऱ्या एका सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफने बेलिंडा बेन्सिकचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. आता गॉफचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अमेरिकेच्या जेसिका पेगुलाबरोबर होणार आहे. पेगुलाने चौथ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या इव्हा जोव्हिकचा 4-6, 6-3, 6-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. झेकच्या 29 वर्षीय कॅरोलिना मुचोव्हाने 2024 सालातील विम्बल्डन विजेती बार्बोरा क्रेसिकोव्हाचा 7-5, 5-7, 6-3 असा फडशा पाडत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थानि मिळविले.
पुरूषांच्या विभागात सर्बियाचा माजी टॉपसिडेड नोव्हॅक जोकोविचने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना रशियाच्या रोमन सैफुलीनचा 7-6 (8-6), 6-3, 3-6, 6-3 असा पराभव केला. विम्बल्डन स्पर्धेतील जोकोविचचा हा विक्रमी 106 वा विजय आहे. जोकोविचने स्वीसच्या रॉजर फेडररचा या स्पर्धेतील नोंदविलेला विश्वविक्रम मोडीत काढला आहे.