ओसाका, जोकोविच, व्हेरेव तिसर्या फेरीत
जॅनिक सिनरचा धक्कादायक पराभव, इलिना रायबाकिना, इमा नेव्हारो, यीबिंग यांचे आव्हान दुसऱ्या फेरीतच समाप्त
वृत्तसंस्था/पॅरिस
2026 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूषांच्या विभागात माजी टॉपसिडेड नोव्हॅक जोकोविच तसेच महिलांच्या विभागात माजी टॉपसिडेड जपानची नावोमी ओसाकाला दुसऱ्या फेरीतील विजयासाठी चांगलेच झगडावे लागले. मात्र क्रोएशियाच्या डोना व्हेकीक तसेच कझाकस्तानची रायबाकिना आणि चीनच्या यीबींग यांचे आव्हान दुसऱ्या फेरीतच समाप्त झाले. पुरूषांच्या विभागात इटलीच्या टॉपसिडेड सिनरला शारीरिक समस्या उद्भवल्याने हार पत्करावी लागली.
पुरूष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात फ्रान्सच्या व्हॅलेटिन रॉयरने सर्बियाच्या जोकोविचला विजयासाठी चांगलेच झुंझविले. मात्र 39 वर्षीय आणि तृतिय सिडेड जोकोविचने रॉयरचा 6-3, 6-2, 6-7 (7-9), 6-3 अशा चार सेट्समधील लढतीत पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. जोकोविचचे विक्रमी 25 वे ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जोकोविचने आतापर्यंत तीनवेळा फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली असून त्याने या स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉमध्ये 22 वेळा स्थान मिळवून यापूर्वी नोंदविलेल्या विक्रमाशी बरोबरी केली.
सिनरचे आव्हान समाप्त
अन्य एका सामन्यात इटलीच्या टॉपसिडेड जॅनिक सिनरला अर्जेन्टिनाच्या जुआन मॅन्युअल सेरुन्डोलोकडून हार पत्करावी लागली. जेतेपदाचा दावेदार असलेल्या सिनरने पहिले दोन सेट जिंकून तिसऱ्या सेटमध्ये 5-1 अशी आघाडी घेतली होती. पण शारीरिक समस्या सुरू झाल्याने त्याने दोनदा मेडिकल टाईम आऊट घेतले. पण तिसरा सेट त्याने गमविला आणि नंतरचे सेट्सही तने एकतर्फी गमावले. सेरुनडोलोने सिनरचा 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशा पाच सेट्समधील लढतीत पराभव केला. या स्पर्धेतील हा सर्वात मोठा धक्कादायक निकाल म्हणावा लागेल. कोबोलीने वूचा 6-4, 6-4, 6-4, स्वज्दाने वॉल्टनचा 6-3, 6-4, 6-7 (4-7), 6-2, फेरीयाने स्ट्रफचा 7-5, 7-6 (7-1), 6-2, कास्पर रुडने मेदजेदोविकचा 6-3, 6-2, 6-4 तसेच जर्मनीच्या अॅलेक्झांडेर व्हेरेवने मॅकहेकचा 6-4, 6-2, 6-2, तियेनने डायझचा 7-5, 4-6, 3-6, 7-6 (7-4), 6-3 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाने क्रोएशियाच्या डोना व्हेकीकचा 7-6 (7-1), 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. ओसाकाला हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 110 मिनिटे झगडावे लागले. 2019 नंतर ओसाकाने या स्पर्धेत पहिल्यांदाच तिसरी फेरी गाठली आहे. ओसाकाचा तिसऱ्या फेरीतील सामना 16 व्या मानांकीत इव्हा जोविकशी होणार आहे. अमेरिकेच्या जोविकने आपल्याच देशाच्या इमा नेव्हारोचा 6-0, 6-3 असा फडशा पाडत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. कझाकस्तानच्या इलिना रायबाकिनाचे आव्हान दुसऱ्या फेरीत युक्रेनच्या युलिया स्टारओडुबेसेव्हाने संपुष्टात आणले. या सामन्यात युलियाने रायबाकिनाचा 3-6, 6-1, 7-6 (10-4) अशा सेट्समध्ये पराभव केला. गेल्या जानेवारीमध्ये रायबाकिनाने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. फ्रेंच स्पर्धेत रायबाकिनाने सलामीच्या फेरीतील सामन्यात व्हेरोनिका इर्जेव्हिकचा पराभव केला होता. दुसऱ्या फेरीतील अन्य सामन्यात श्वालिन्स्काने एलिस मर्टेन्सचा 6-4, 6-2, ओलिनकोव्हाने बिरेलचा 6-3, 0-6, 7-6 (10-5), स्नेडरने केस्लरचा 7-6 (7-3), 6-1, मुचोव्हाने रखीमोव्हाचा 6-2, 6-2 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला.