ओरोस येथे वनराई बंधाऱ्याच्या कामाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामस्थांसह स्काउट-गाईडचा सहभाग
सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ओरोस बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने वनराई बंधारा बांधण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायत, स्काउट-गाईड विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला.
यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आतापासूनच कच्चे व वनराई बंधारे उभारण्याच्या सूचना पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार ओरोस ग्रामपंचायतीने जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली आहे.
या उपक्रमात ओरोसच्या सरपंच आशा मुरमुरे, उपसरपंच पांडुरंग मालवणकर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ तसेच स्काउट-गाईडचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी श्रमदान केले.
पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशाने वनराई बंधाऱ्यांची संख्या वाढवून ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे सरपंच आणि उपसरपंच यांनी सांगितले. आगामी काळात विविध ठिकाणी बंधारे उभारण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.