ओरिसा- पश्चिम बंगाल ला आज धडकणार वादळ
सतर्कतेचा इशारा,रेड अलर्ट जारी
पुणे / प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरात बुधवारी दाना या वादळाची निर्मिती झाली असून, हे वादळ गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान ओरिसाच्या पुरी ते बंगालच्या सागर दरम्यान धडकण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.यामुळे ओरिसा तसेच पश्चिम बंगाल ला रेड अलर्ट देण्यास आला असून, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
अंदमान व लगतच्या भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे आता वादळात रूपांतर झाले आहे. हे क्षेत्र उत्तर पश्चिमेकडे सरकत असून, गुरुवारी त्याचे आणखी तीव्र वादळात रूपांतर होणार आहे. ओरिसा आणि पश्चिम बंगाल च्या किनारपट्टीवर असलेल्या पुरी तसेच सागर दरम्यान असलेल्या भितरकनिका आणि धमारा येथे ते धडकणार आहे. गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटे दरम्यान वादळाचा मुख्य झंझावात राहणार असून, यावेळी ताशी 110 ते 120 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. या भागात अतिवृष्टीचा इशारा आहे.जमिनीवर आल्यानंतर वादळाची तीव्रता कमी होणार आहे.मात्र ओरिसा व पश्चिम बंगाल मध्ये शुक्रवार पर्यंत पावसाचा तीव्र मारा राहील. आहे.त्यानंतर हळू हळू पावसाचे प्रमाण कमी होईल.या भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली असून, रेल्वे, रस्ता, हवाई वाहतूकी वरही परिणाम होणार आहे.वादळामुळे पूर्ण पूर्व किनारपट्टीवर वादळी पाऊस राहील.कर्नाटकच्या काही भागातही वादळी पाऊस राहणार आहे.समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याची सूचना करण्यात आली आहे.
दाना हे तिसरे वादळ
दरम्यान, यावर्षी निर्माण झालेले दाना हे तिसरे तर मॉन्सून नंतरचे पाहिले वादळ ठरले आहे. याआधी रिमेल आणि असना ही वादळे निर्माण झाली होती. सध्याचे दाना हे वादळ ओरीसावर जास्त परिणाम करणार आहे. दाना हे नाव कतार या देशाने दिले आहे .
राज्यात तुरळक पाऊस
गुरुवारी दक्षिण कोकण, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही जिह्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांनतर पुढील दोन दिवस राज्यात हवामान कोरडे राहील