दाणोली लिंगमाऊली मंदिरात आजपासुन दत्तयाग व नवचंडी यज्ञ
शुक्रवारी २ मे रोजी सांगता
; विविध कार्यक्रमांचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
दाणोली गावचे ग्रामदैवत श्री लिंगमाऊली मंदिरात बुधवार ३० एप्रिल पासुन 'राक्षोघ्र विधान', 'दत्तयाग यज्ञ', 'सग्रह सहोम नवचंडी' या धार्मिक सोहळ्यास प्रारंभ होत आहे. देवसु पाठोपाठ दाणोली या गावातही पहिल्यांदाच हा धार्मिक सोहळा होत असुन शुक्रवारी या उत्सवाची सांगता होणार आहे. देवसु गावाप्रमाणे या गावातही हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी दाणोलीवासिय सज्ज झाले आहेत. या धार्मिक सोहळ्यासाठी सोमवारी दाणोली लिंग माऊली मंदिरात देवसु येथील श्री देवी शेंडोबा माऊली मंदिरातुन सवाद्य मिरवणुकीने तरंग काठीसह पालखी व देवतांचे आगमन झाले आहे. बुधवारी सकाळी शिमधड्यांचे पारंपारीक पद्धतीने सवाद्य स्वागत करण्यात आले. सायंकाळी देवांना नारळ ठेवणे, त्यानंतर गणपती पूजन, स्वस्तिवाचन, राक्षोघ्न विधान धार्मिक कार्यक्रम होणार आहे.गुरुवार १ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून प्रायश्चित्त विधी, पुण्यहवाचन, देवता स्थापना, दत्त याग आणि नवचंडी जप, आरती, नैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता भजन सम्राट अमित तांबोळकर यांचे सुश्राव्य भजन, त्यानंतर दाणोली ग्रामस्थांची भजने होणार आहे. शुक्रवार २ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून प्राकार शुद्धी, स्थापित देवता पूजन, कुंकूमार्जन, कुमारिका पूजन दत्तयाग व नवचंडी यज्ञ, बलिदान (पायस कुष्मांड) पूर्णाहूती, अभिषेक, आशिर्वाद नैवेद्य, आरती महाप्रसाद त्यानंतर दुपारी २ वाजल्यापासून देवीची ओटी भरण्यास प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ६ वाजता प्रा रुपेश पाटील यांच्या बहारदार निवेदनाखाली खेळ पैठणीचा जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता ह भ प आजगावकर बुवा (मालवण) यांचे सुश्राव्य किर्तन, रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. भाविकांच्या सोयीसाठी मंदिरासभोवताली भव्य सभा मंडप उभारण्यात आला असुन आकर्षक विद्युत रोषणाईसह झेंडे व पताका लावून मंदिर सजविण्यात आले आहे. आंबोली- सावंतवाडी रस्त्यावरील कुंभेश्वर येथून आकर्षक स्वागत कमान उभारून रस्त्यावर रांगोळी घालून व पताका लावल्यामुळे संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण होते. चाकरमानीही या उत्सवासाठी दाखल झाले आहेत. समस्त भाविक भक्तांनी या धार्मिक सोहळ्यात उपस्थित राहून देवतांचा कृपाशीर्वाद घ्यावा असे आवाहन दाणोली गाव मर्यादा व ग्रामस्थांनी केले आहे.