देवसू शेंडोबा माऊली मंदिरात उद्यापासून नवचंडी व दत्तयाग यज्ञ
तीन दिवस विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
देवसू गावचे ग्रामदैवत शेंडोबा माऊली मंदिरात
गुरुवार २४ एप्रिल पासून नवचंडी व दत्तयाग यज्ञाला प्रारंभ होत असून तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्याची सांगता शनिवारी २६ एप्रिल रोजी होणार आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी शेंडोबा माऊली मंदिरात केसरी येथून येथील स्वयंभू मंदिरातुन सवाद्य मिरवणुकीने तरंग काठीसह पालखी व देवतांचे आगमन झाले. केसरीचा स्वयंभू, देवसूची शेंडोबा माऊली तर दाणोली गावठणची लिंगमाऊली अशी तीन गावांच्या देवस्थानची रचना आहे. या तिन्ही गावाचे मानकरी असलेला सावंत समाज व इतर सर्वजण धार्मिकदृष्ट्या संघटित असून एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतात. या तीन गावांमध्ये सुख समाधान आणि शांती लाभण्यासह या देवतांचे धार्मिक महात्म्य सतेज व अबाधित राखण्यासाठी या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दाणोली लिंग माऊली मंदिरात बुधवार ३० एप्रिल ते शुक्रवार २ मे तर केसरी स्वयंभू मंदिरात सोमवार ५ मे ७ मे असा या तिन्ही गावात प्रत्येकी ३ दिवस हा धार्मिक सोहळा होणार आहे. या तिन्ही गावात पहिल्यांदाच हा धार्मिक सोहळा होत आहे. गुरुवार २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सुमारे १० गावातील शिमधड्यांचे विधिवत स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत देवांना नारळ ठेवणे, गणपती पूजन, स्वस्तिवाचन, राक्षोघ्न विधान धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार २५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजल्यापासून प्रायश्चित्त विधी, पुण्यहवाचन, देवता स्थापना, दत्त याग आणि नवचंडी जप, आरती, नैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसाद, संध्याकाळी ७ वाजता ह. भ. प. नातू बुवा यांचे सुश्राव्य किर्तन त्यानंतर महाप्रसाद, रात्री १० वाजता भजन होणार आहे. शनिवार २६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजल्यापासून प्राकार शुद्धी, स्थापित देवता पूजन, कुंकूमार्जन, कुमारिका पूजन दत्तयाग व नवचंडी यज्ञ, बलिदान (पायस कुष्मांड) पूर्णाहूती, अभिषेक, आशिर्वाद नैवेद्य, आरती महाप्रसाद त्यानंतर दुपारी २ वाजल्यापासून देवीची ओटी भरण्यास प्रारंभ होणार आहे. रात्री १० वाजता सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत. गावात प्रथमच हा धार्मिक सोहळा होत असल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. शेंडोबा माऊली सभोवताली भव्य सभा मंडप उभारण्यात आला असून आकर्षक विद्युत रोषणाई तसेच गावातील धार्मिक क्षेत्रात पताका लावून संपूर्ण गाव या उत्सवासाठी सज्ज झाला आहे. चाकरमानीही गावात दाखल होत आहेत. समस्त भाविक भक्तांनी या धार्मिक सोहळ्यात उपस्थित राहून देवतांचा कृपाशीर्वाद घ्यावा असे आवाहन देवसू, दाणोली, केसरी या तीन गावच्या गाव मर्यादा व या तीन गावच्या ग्रामस्थांनी केले आहे.