काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी आता ‘संघटन सृजन अभियान’
काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माहिती : 17 फेब्रुवारीपासून अभियान सुरू
पणजी : काँग्रेस पक्ष संघटना गोव्यात बळकट करण्यासाठी संघटन सृजन अभियान राबवण्यात येणार असून त्याकरीता गोवा राज्याचे चार जिल्हे करण्यात आले आहेत. त्यांचे अध्यक्ष येत्या 1 मार्चपर्यंत निवडले जातील, अशी माहिती काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिली. पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटनेत काही बदल करण्याचे ठरवण्यात आले असून ती प्रक्रिया सर्व राज्यातून चालू आहे. त्यात प्रामुख्याने जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती करणे आणि जिल्ह्यातील पक्षांची जबाबदारी अध्यक्षांवर देणे ही नवीन पद्धत अंमलात आणली जाणार आहे असे त्यांनी नमूद केले. गोवा राज्यात प्रत्यक्षात तीन जिल्हे असले तरी संघटनेच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाने चार जिल्हे निश्चित केले आहेत. उत्तर गोवा, दक्षिण गोवा, कुशावती आणि म्हादई अशी नावे त्यांना देण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी पक्षाचा एक केंद्रीय निरीक्षक देण्यात आला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्षांची नेमणूक होणार आहे.
उत्तर गोवा - शोभा ओझा, म्हादई - आर . सी. गुंतिया, दक्षिण गोवा- एन. रघुवीर रेड्डी आणि कुशावती - विजय सिमला अशी त्या निरीक्षकांची नावे असून त्यांना सहाय्य करण्याकरीता काँग्रेसचे आमदार, खासदार आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी नेमण्यात आले आहेत. येत्या 17 फेब्रुवारीपासून हे अभियान सुरू होणार असून केंद्रीय निरीक्षक आणि इतर स्थानिक पदाधिकारी संबंधित जिल्ह्यात 7 दिवस वास्तव्य करणार आहेत. येथे कार्यकर्ते लोकांशी चर्चा करून अध्यक्षांसाठी तीन नावे काढली जाणार आहेत. त्यातील एका नावास सर्वानुमते अध्यक्ष म्हणून मान्यता देण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, आमदार एल्टन डिकॉस्ता,कार्लूस फरेरा आणि माजी खासदार फ्रांन्सिस सार्दिन यांची उपस्थिती होती.