Monik Mohite Farmer Kolhapur: शेतीतील मातीला नवजीवन देणाऱ्या मोनिका मोहिते
आपल्या कार्यातून खऱ्या अर्थाने नवदुर्गेचं रूप साकारलं आहे
By : गौतमी शिकलगार
कोल्हापूर : शारदीय नवरात्र म्हणजे देवीच्या सामर्थ्याचा उत्सव. दुर्गेची नऊ रूपं आपल्याला धैर्य, त्याग, करुणा आणि पराक्रम शिकवतात. हाच ध्यास आपल्या कृतीतून जगणाऱ्या काही स्त्रियांमध्ये दिसतो. अशाच एका उच्च शिक्षित स्त्रीने मातीत रुळून ‘सेंद्रिय शेती’चा दीप प्रज्वलित केला. गाई-मातीशी नाते जोडून, महिलांना रोजगार देऊन आणि शेतकऱ्यांशी घट्ट नातं जोडले.
शिक्षण, निसर्गप्रेम आणि परंपरेच्या संगमातून त्यांनी शाश्वत शेतीचा आदर्श घडविला. त्यांनी आपल्या कार्यातून खऱ्या अर्थाने नवदुर्गेचं रूप साकारलं आहे. आजच्या काळात ग्रामीण आणि शहरी महिलांनी अनेक क्षेत्रांत आपली ओळख निर्माण केली आहे. शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा, राजकारण या सर्व क्षेत्रात महिलांनी कर्तृत्व गाजवले. पण, शेतीसारख्या कठीण क्षेत्रात आधुनिक दृष्टिकोनातून प्रयोग करून समाजाला नवा मार्ग दाखवणाऱ्या महिला आज खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरल्यात.
त्यापैकीच एक म्हणजे कोल्हापुरातील पारखी फार्मच्या संस्थापक मोनिका मोहिते. कोल्हापूर जिल्हा हा क्रीडा, कला, परंपरा आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. याच भूमीवर मोनिका मोहिते यांचा एक प्रेरणादायी प्रवास उभा राहिलाय. इंग्रजी आणि कॉम्प्युटर विषयात पदव्युत्तर पदवी आणि क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये डिप्लोमा केलेल्या मोनिका मोहिते आज सेंद्रिय शेतीत नावारूपास आल्या आहेत. ग्वाल्हेरमध्ये त्यांचे शिक्षण झाले. लग्नानंतर त्या कोल्हापूरच्या सूनबाई झाल्या. त्यानंतर त्यांच्या जीवनाची दिशा बदलली.
मातृत्वामुळे त्यांच्या विचारांचा दृष्टिकोन बदलला. मुलांचे स्पोर्ट्स करिअर आणि आरोग्यासाठी शुद्ध, रसायनमुक्त अन्नाची जाणीव झाली आणि तिथून शेतीकडे प्रवास सुरू झाला. त्यांच्या 40 एकर शेताला ‘पारखी’ हे नाव देण्यात आले. पार्वती (सासूबाई) आणि ख्याती (मुलगी) यांच्या नावांच्या संयोगातून निर्माण झालेले हे नावच त्यांच्या प्रवासाचे सार सांगते.
सासू-सासऱ्यांचा आणि घरातील सर्वांचा पाठिंबा मिळाल्याने हा उपक्रम अधिक बळकट झाला. एका आजारी गायीपासून सुरू झालेला प्रवास आज तब्बल 100 देशी गाईंपर्यंत पोहोचला आहे. मोनिका यांच्या मते, ‘सेंद्रिय शेती देशी गायीशिवाय शक्य नाही.’ गायीच्या शेण-गोमूत्रावर आधारित खते, जीवामृत, पंचगव्य, दशपर्णी यांसारख्या पद्धतींनी त्यांनी प्रयोग केले.
अमावस्या-पौर्णिमा यासारख्या चंद्रसूर्य चक्रांचा उपयोग करून कीटकनाशन करण्याचे त्यांचे संशोधन उल्लेखनीय ठरले आहे. गायीच्या शेणाच्या कुंड्या, बीज संस्कार, सीड बॉल्स, पोल्ट्री फार्म अशा विविध प्रयोगांनी मोनिका यांनी आपले शेत वेगळे केले. देशी गायी आणि देशी कोंबड्यांच्या मदतीने त्यांनी मातीला नवे जीवन दिले. दूध आणि अंडी या नैसर्गिक पोषणस्रोतांच्या मदतीने उपयोगी खत तयार करता येतात, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
मोनिका यांनी केवळ शेतीच केली नाही तर समाजासाठीही योगदान दिले. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी कापडी पिशव्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला. पर्यावरणपूरक पॅकेजिंग ही त्यामागची संकल्पना होती. पन्नासपेक्षा अधिक महिला या उपक्रमाशी जोडल्या गेल्या. कोरोना काळात बाजारपेठ बंद असताना त्यांनी आंब्यापासून ‘मँगो पल्प’ तयार केला. तसेच सोयाबीनपासून विविध पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण घेतले.
तसेच आरोग्यदायी जीवनशैलीसाठी त्यांनी शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले. ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वारीत चालणाऱ्या शेतकऱ्यांची साधी जीवनशैली, त्यांचा आत्मविश्वास आणि विठ्ठलावरील श्रद्धेने मोनिका यांना खूप काही शिकवले. ‘शेतकऱ्यांकडून मिळणारे अनुभव हे पुस्तकांमध्ये मिळत नाहीत,’ असे त्या ठामपणे सांगतात. सेंद्रिय शेतकरी म्हणून मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे.
शेतीशी नाते जोडा!
चिंतामुक्त आयुष्य, उत्तम आरोग्य आणि आनंद हवा असेल तर शेतीशी नाते जोडा. जीमला न जाता शेतात काम केले तरी शरीराला ताकद मिळते, मन प्रसन्न राहते आणि प्राण्यांविषयी आपुलकी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. 40 एकर शेती इकोसिस्टमसारखी विकसित मोनिका यांची 40 एकर शेती एक संपूर्ण इकोसिस्टमसारखी विकसित झाली आहे.
सोयाबीन, ऊस, ज्वारी, भात, डाळी, चिकू, आंबा, भाज्या यासोबतच पशुपालन आणि कुक्कुटपालनही त्यांनी सुरू केले आहे. उसापासून तयार होणारी गूळ पावडर, आंब्याचे पल्प, सोयाबीनचं पीठ, ताज्या भाज्या, डाळी, अंडी आणि गायीच्या शेणापासून तयार केलेले धूपकांडीसारखे नवकल्पित प्रॉडक्ट्सही त्यांनी बाजारात आणलेत.