राज्योत्सवासाठी सर्वसामान्य प्रवासी वेठीस
बससेवा ठप्प : प्रवाशांचे हाल, खासगी वाहनांचा आधार
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्योत्सव दिनानिमित्त शुक्रवारी प्रवाशांना वेठीस धरण्यात आले. विविध भागातील बससेवा बंद केल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, प्रवासीही बसथांब्यावर अडकून पडल्याचे चित्रही पहावयास मिळाले. ऐन दिवाळीतच राज्योत्सवासाठी बससेवा बंद केल्याने प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
शुक्रवारी सकाळी काही गावातून बसेस बेळगावकडे धावल्या. मात्र, त्यानंतर सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे बेळगावला आलेल्या प्रवाशांना माघारी परतणे अशक्य झाले. दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानकात प्रवासी अडकून पडल्याचेही दिसून आले. दरम्यान, काही प्रवाशांना खासगी वाहनांना जादा पैसे देऊन घर गाठावे लागले. राज्योत्सव दिनामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसला.
धांगडधिंगाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम
राज्योत्सव दिनानिमित्त शहरातील विविध मार्गांवर डॉल्बीसह धांगडधिंगाणा घालणाऱ्या युवकांमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. वाहनधारकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील आणि उपनगरातील वाहतूक विस्कळीत झाल्याचे दिसून आले. यामुळे प्रवासी आणि वाहनधारकांचे हाल झाले.
विनाकारण बॅरिकेड्स
राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात विनाकारण काही ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला. वाहनधारकांना मोठ्या प्रयासाने गल्ली-बोळातून मार्ग काढावा लागला. सकाळपासूनच विविध मार्गावर बॅरिकेड्स, स्टेज आणि डीजे लावल्याने सर्वसामान्यांना विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागला.
बससेवा कोलमडली
शहर आणि ग्रामीण भागातील शुक्रवारी बससेवा कोलमडली. ऐन दिवाळी सणात जाणीवपूर्वक बस बंद करण्यात आल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची आणि पै-पाहुण्यांची हेळसांड झाली. आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या परिवहनला राज्योत्सव दिनाचा फटका बसला आहे.
वस्तीच्या बसेसही बंद
राज्योत्सव दिनासाठी ग्रामीण भागातील वस्तीच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे पहाटे लवकर आणि रात्री उशिराने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. पूर्वकल्पना न देताच बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. विनाकारण खासगी वाहतुकीला अधिक पैसे मोजावे लागले. रात्री उशिराने धावणाऱ्या बसेस बंद झाल्याने प्रवाशांना घरी पोहोचताना मोठी अडचण झाली.