रेंट-अ-कार, टॅक्सींना ‘स्पीड गव्हर्नर’ बसविण्याचे आदेश
पणजी : रेंट - अ - कॅब आणि टॅक्सींचे गोव्यात होणारे वाढते अपघात रोखण्याच्या हेतूने वाहतूक खात्याने जाहीर नोटीस प्रकाशित केली असून त्या वाहनांनी ‘स्पीड गव्हर्नर’ (गतिरोधक) तातडीने बसवण्यास बजावले आहे. जर त्याचे पालन झाले नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाहतूक खात्याचे संचालक अरविंद खुटकर यांनी सदर नोटीस प्रकाशित केली आहे. रेंट - अ - कार, टॅक्सी यांचे अलिकडच्या काळात अपघात वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर वाहनचालक प्राधान्याने पर्यटक असतात आणि अपघात झाल्यानंतर ते वाहनासह पळ काढतात. अपघातात जखमी झालेल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे सौजन्यही ते दाखवत नाहीत.
हे प्रकरण शेवटी पोलिसांपर्यंत जाते आणि वाहनाच्या चालकास अटक करण्यासाठी त्यांना बरीच यातायात करावी लागते. सदर वाहने वेगाने चालवली जातात आणि त्या वेगावर चालकाचे कोणतेही नियंत्रण नसते. अनेकदा चुकीच्या मार्गाने ती वाहने नेण्यात येतात आणि अपघात घडतात. गेल्या वर्षात अनेकांचे निष्पाप बळी त्यात गेले असून त्यावर उतारा म्हणून आता वाहतूक खात्याने सदर वाहनांना मोटार वाहन कायद्यानुसार ‘स्पीड गव्हर्नर’ बसवावेत असे आदेश दिले आहेत. तथापि नोटिसीतील माहितीनुसार त्या कामासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम असून सर्वजण त्याचे पालन करतीलच याची कोणतीही शाश्वती नाही. ‘स्पीड गव्हर्नर’ बसवले म्हणजे काम झाले असे नसून ते कार्यरत असले पाहिजे, असे नोटिसीतून म्हटले आहे.