झोमॅटोवरुन जेवण मागवणे पुन्हा महागले
कॅश ऑन डिलिव्हरीसाठी 5 ते 20 रुपयांपेक्षा जास्त महाग : ऑनलाईन पेमेंटवर सूट
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोवरून जेवण मागवणे आता महाग झाले आहे. आता झोमाटोवरून जेवण मागवताना तुम्ही ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ हा पर्याय निवडल्यास, 5 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. हे नवीन शुल्क अॅपच्या बिल सारांशामध्ये ‘पे ऑन डिलिव्हरी फी’ या नावाने स्वतंत्रपणे जोडले जाईल. काही वापरकर्त्यांच्या अॅप बिलामध्ये हे शुल्क 7 ते 20 रुपयांपर्यंत स्वतंत्रपणे दिसत आहे.
मात्र, जे वापरकर्ते युपीआय क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगसारख्या डिजिटल माध्यमांद्वारे ऑनलाइन पेमेंट करतील, त्यांच्याकडून हे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. प्लॅटफॉर्म फी आणि पॅकिंग शुल्काव्यतिरिक्त, नवीन शुल्क आकारले जातील.
झोमॅटोने सुरू केलेली ही नवीन ‘पे ऑन डिलिव्हरी फी’ कंपनीची प्लॅटफॉर्म फी, रेस्टॉरंट पॅकेजिंग शुल्क, डिलिव्हरी शुल्क आणि जीएसटी पेक्षा वेगळी आहे. आता तुम्हाला जेवणासोबत पॅकेजिंग, डिलिव्हरी, प्लॅटफॉर्म आणि रोख पेमेंटसाठी स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील. मात्र, स्विगीने सध्या तरी असे कोणतेही शुल्क लागू केलेले नाही. या लहान शुल्कांमुळे कंपनीला कोट्यावधी रुपयांचा फायदा होत आहे. झोमॅटोवर दररोज सुमारे 23 ते 25 लाख ऑर्डर्स दिल्या जातात. केवळ 5 रुपयांचे छोटे अतिरिक्त शुल्क आकारल्यास, कंपनी दररोज 1.25 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकते.
जरी सर्व ग्राहक कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडणार नसले, तरी या निर्णयामुळे झोमाइटोच्या नफ्यात वार्षिक शेकडो कोटी रुपयांची वाढ होईल. प्लॅटफॉर्म शुल्क 2 रुपयांपासून सुरू होऊन 14.99 रुपयांपर्यंत वाढले. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरील ऑर्डर्सवर वेगवेगळे शुल्क लावण्याची प्रक्रिया नवीन नाही. एप्रिल 2023 मध्ये, झोमाइटो आणि स्विगीने केवळ 2 रुपयांच्या प्लॅटफॉर्म शुल्काने सुरुवात केली होती, जे आता प्रति ऑर्डर 14.99 रुपये (अधिक 18 टक्के जीएसटी) झाले आहे.