संभल मशिदीच्या रंगसफेदीचा आदेश
अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निवाडा
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीच्या बाह्या भागाची रंगसफेदी करावी, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाला दिला आहे. रंगसफेदीचे काम एका आठवड्यात पार पाडावे, असेही आदेश स्पष्ट करण्यात आले आहे. रंगकाम करताना मशिदीच्या रचनेत कोणतेही परिवर्तन करण्यात येऊ नये, अशी सूचना न्यायालयाने विभागाला केली आहे.
मशिदीच्या बाह्या भागाची रंगसफेदी करण्यात कोणती अडचण आहे, अशी विचारणा सोमवारी उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाच्या वकीलांकडे केली होती. तसेच या संदर्भात नेमके मुद्दे लेखी स्वरुपात देण्याचा आदेशही दिला होता. या वादग्रस्त मशिदीला बाहेरुन रंग लावणे आणि विद्युत रोषणाई करण्याची आवश्यकता आहे, असे मुस्लीम बाजूचे म्हणणे होते. बुधवारी न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकीलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर रंगसफेदीचा आदेश दिला आहे.
वादग्रस्तता कशासाठी...
गेल्या अनेक वर्षापासून संभलमधील ही मशीद वादग्रस्ततेत आहे. पुरातन हिंदू मंदिर पाडवून ही मशीद मुस्लीम आक्रमकांनी बांधली आहे, असे हिंदू पक्षाचे प्रतिपादन आहे. या प्रतिपादनाला मुस्लीम पक्षाने तसेच मशिदीच्या व्यवस्थापनाने विरोध केला आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहचले असून तेथे सुनावणी केली जात आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात 1991 मध्ये करण्यात आलेल्या पूजास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेसंबंधी सुनावणी होत आहे. ही सुनावणी संपेतर्यंत कोणत्याही पूजास्थळासंबंधी निर्णय देऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तो संभल मशिदीलाही लागू करण्यात आला आहे.