मॅप्रो गार्डन सील करण्याचे आदेश
कुडाळ :
पाचगणी परिसरातील गुरेघर येथे सुप्रसिद्ध असणारे मॅप्रो गार्डन विनापरवाना सुरू असल्याने सदर मॅप्रो गार्डन व ठिकाण सील करून कंपनी व संचालकाच्या विरोधात तातडीने फौजदारी व कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस महाबळेश्वर तहसीलदारांनी पाचगणी मंडलाधिकारी लामन पाकणी यांच्याद्वारे कारवाईचे आदेश धाडले आहेत. या कारवाईच्या नोटिसांमुळे पाचगणी परिसरात एकच खळबळ माजली आहे.
गुरेघर (ता. महाबळेश्वर) येथील स. न. नंबर 15 / एक /दोन मधील मॅप्रो गार्डन विनापरवाना सुरू असल्याची धक्कादायक माहिती महाबळेश्वर तहसीलदारांनी एका नोटीसाद्वारे समोर आणली आहे. याबाबत संबंधित कंपनीचे सर्व संचालक यांच्यावर तातडीने फौजदारी व कायदेशीर कारवाईचे आदेश देखील दिलेले आहेत. याबाबत वाई उपविभागीय अधिकाऱ्यांच्याकडील पत्र क्रमांक जमीन कावी/1026/2024 28 डिसेंबरच्या पत्रानुसार सदर मॅप्रो गार्डन परिसरातील विनापरवाना मॅप्रो गार्डन व परिसरातील जागा यांचे प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश देखील महसूल विभागातील महाबळेश्वर तहसीलदार यांनी दिलेले आहेत. संबंधितांचे जबाब घेऊन अत्यावश्यक कागदपत्राचे स्वयं स्पष्ट अभिप्राय अहवाल महाबळेश्वर तहसील कार्यालयाला तात्काळ पाठवावा असा आदेश देखील महाबळेश्वर तहसीलदारांनी धाडला आहे.
पाचगणीच्या लगतच असणाऱ्या गुरेघर परिसरातील मॅप्रो गार्डनवर यापूर्वी देखील अनेक तक्रारी झाल्या होत्या त्या संपूर्ण तक्रारीचा पाढा आता पुन्हा एकदा या कारवाईच्या अनुषंगाने समोर वाचला जाणार आहे. मॅप्रो गार्डनच्या परिसरातील असणारी वाहतुकीची कोंडी हा देखील चर्चेचा विषय झाला आहे. आता मॅप्रो गार्डनचे विनापरवाना सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत थेट आता संचालक व कंपनीच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आणि अहवाल सादर करण्याची नोटीस आल्याने आता याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर पोलीस यंत्रणा नेमकी काय कारवाई करते याकडे संपूर्ण सातारा जिह्याचे व पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. मॅप्रो कंपनीबाबत अनेकवेळा माहितीच्या कायद्याआधारे अनेकांनी माहिती समोर आणली होती. मात्र अद्यापही जिल्हाधिकारी त्याचबरोबर जिल्हा प्रशासन यांनी याबाबत ठोस कारवाई कधीच केली नाही. त्यामुळे आता थेट तहसीलदारांनीच याबाबत फौजदारीचे गुन्हे दाखल करावेत असा आदेश दिल्याने हा आदेशाचे यंत्रणेकडून कितपत पालन होतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.