हरमलातील ‘तो’ शॅक पाडण्याचा आदेश
शॅकच्या मूळ मालकाला 25 लाखांचा दंड : यापुढे शॅकसाठी अर्जही करु शकणार नाही
पणजी : हरमल किनारपट्टीवर ज्या शॅकमध्ये तेथील स्थानिक अमर दत्ताराम बांदेकर या युवकाचा खून झाला, तो शॅक पाडण्याचा आदेश पर्यटन खात्यातर्फे जारी करण्यात आला आहे. शिवाय तो शॅक दुसऱ्या बिगरगोमंतकीयाला भाड्याने चालवायला दिल्याप्रकरणी शॅकचा मूळ मालक मान्युएल फर्नांडिस याला खात्याने रु. 25 लाखांचा दंड ठोठावला आहे. येत्या 7 दिवसात शॅक पाडण्यात यावा असे आदेशात बजावले असून त्या मुदतीत शॅक न पाडल्यास ती कारवाई खाते करणार आहे. तसेच त्याचा खर्च फर्नांडिस यांच्याकडून वसूल करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
खुनाचा प्रकार घडल्यानंतर पर्यटन खात्यातर्फे त्या शॅकची कागदपत्रे तपासण्यात आली तेव्हा तो दुसऱ्याला भाड्याने चालवण्यास दिल्याचे समोर आले. त्याची गंभीर दखल खात्याने घेऊन ही कारवाई केली आहे. शॅक भाड्याने देणे हे शॅक धोरणाच्या कलम 20 चे उल्लंघन आहे, असा ठपका ठेवण्यात आला असून यापुढे शॅक वाटपाच्या प्रक्रियेत फर्नांडिस याला सहभागी होण्यासाठी बंदी घातली आहे. शॅकसमोर लावलेल्या आणि फिरण्यासाठी अडचण होणाऱ्या काही खुर्च्या बाजूला केल्या म्हणून बिगरगोमंतकीय शॅक कर्मचाऱ्यांनी अमर बांदेकर या स्थानिक युवकाशी वाद घालून त्यास मारहाण केली. त्यात त्याला जीव गमवावा लागला असून या प्रकरणाने सरकारी यंत्रणा जागी झाली आहे.