आज सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
बेळगावसह उत्तर कर्नाटकात साधारण पाऊस : हवामान खात्याचा अंदाज
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात परतीचा पाऊस सुरुच आहे. पुढील 10 दिवस विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असून बुधवारी किनारपट्टीवरील मंगळूर, उडुपी तसेच चिक्कमंगळूर, शिमोगा, कोडगू, चामराजनगर आणि हासन जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर कर्नाटकाच्या तुलनेत दक्षिण कर्नाटकातील जिल्ह्यांत पुढील दहा दिवस परतीचा पाऊस होणार आहे. बुधवारी किनारपट्टीवरील दोन जिल्हे, मलनाड भागातील तीन आणि जुने म्हैसूर भागातील दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
किनारपट्टीवरील उडुपी आणि मंगळूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याने खबरदारी म्हणून येथील मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उर्वरित 24 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. बेंगळूर ग्रामीण, चिक्कबळ्ळापूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, कोलार, मंड्या, म्हैसूर, रामनगर आणि तुमकूर जिल्ह्यांत साधारण पावसाचे अनुमान आहे. उत्तर कर्नाटकात बागलकोट, बेळगाव, बिदर, धारवाड, गदग, हावेरी, कलबुर्गी, कोप्पळ, रायचूर आणि यादगिर जिल्ह्यांतही साधारण पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्याची राजधानी बेंगळूरमध्ये बुधवारी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. येथील तापमान कमाल 24 अंश सेल्सिअस आणि किमान 20 अंश सेल्सिअस नेंद होण्याचा अंदाज असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे