For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅन्सरग्रस्त रुग्णांत आशावाद निर्माण करावा

10:32 AM Feb 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
कॅन्सरग्रस्त रुग्णांत आशावाद निर्माण करावा
Advertisement

काहेरचे कुलगुरु डॉ. नितीन गंगणे : डॉ. संपतकुमार शिवणगी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जागृती कार्यक्रमाचे उद्घाटन

Advertisement

बेळगाव : प्रगत वैद्यकीय विज्ञानामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारातून ऊग्णाला जीवदान मिळवून देणे शक्य झाले आहे. हे रुग्ण आजारमुक्त होऊन सामान्य नागरिकांप्रमाणे  जीवन जगू शकतात. कॅन्सर झालेल्यांनी भीतीने गांगरून जाऊ नये. त्यांचे भय दूर करण्याचे प्रयत्न समाजाकडून किंबहुना डॉक्टरांकडून झाले पाहिजेत. रुग्णांत आशावाद निर्माण करावा. रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार घेऊन रोगमुक्त व्हावे, असे आवाहन केएलई हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे (काहेर) कुलगरु डॉ. नितीन गंगणे यांनी केले. जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने येथील केएलई संस्थेच्या डॉ. संपतकुमार शिवणगी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मंगळवारी झालेल्या कॅन्सर जागृती कार्यक्रमाचे उद्घाटन करून डॉ. गंगणे बोलत होते. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागे असलेल्या कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या रुग्णांना मदत देण्याबरोबरच समाजातही जागृती घडविण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, असे डॉ. गंगणे म्हणाले.

कॅन्सर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली म्हणाले, डॉ. संपतकुमार शिवणगी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था करण्यात आली असून आधुनिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यानंतर कॅन्सरमुक्त रुग्णांचा सत्कार करण्यात आला. काही रुग्णांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बेळगाव टपाल विभागातर्फे विशेष लिफाफ्याचे (कव्हर) अनावरण यावेळी करण्यात आले. जवाहरलाल नेहरू वैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. महांतशेट्टी, उपप्राचार्य डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी, केएलई युएसएमचे संचालक डॉ. एच. बी. राजशेखर, डॉ. राजेश पवार, चॅरिटेबल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरीफ मालदार, क्लिनिकचे प्रशासक डॉ. इम्तियाज अहमद, कॅन्सरतज्ञ, डॉ. कुमार विंचूरकर, डॉ. महेश कल्लोळी, डॉ. संतोष मठपती, डॉ. रश्मी पाटील, डॉ. राजेंद्र मेटगुडमठ, डॉ. रोहन भिसे, डॉ. सपना के., डॉ. राघवेंद्र सागर, डॉ. रोहित पाटील आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.