पेट्रोल-डिझेलपेक्षा इतर इंधनांचा पर्याय स्वीकारा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाहन कंपन्यांना इशारा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आता स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, देशात पेट्रोल आणि डिझेल वाहनांचे भविष्य फार काळ टिकणार नाही. त्यांनी इशारा देताना म्हटले आहे की वाहन कंपन्यांनी वेळनुसार बदलावे. जर त्यांनी काळाबरोबर बदल केला नाही, तर त्यांना भविष्यात अडचणींना तोंड देण्याची वेळ येऊ शकते. आता भारतातील वाहनांच्या भविष्याबद्दल एक मोठे विधान समोर आले आहे, जे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून आले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेल वाहनांचे भविष्य आता फार काळ टिकणार नाही. त्यांनी वाहन कंपन्यांना इशारा दिला आहे की, जर त्यांनी काळाबरोबर बदल केला नाही, तर त्यांना भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
पेट्रोल-डिझेलला भविष्य नाही
बसवर्ल्ड इंडिया 2026 परिषदेत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, भारताला आता पारंपरिक इंधनावरील आपले अवलंबित्व कमी करावे लागेल. पेट्रोल आणि डिझेलवरील अतिरिक्त अवलंबित्व देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करते, विशेषत: जेव्हा आंतरराष्ट्रीय तणाव वाढत आहे आणि इंधन पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यांनी वाहन उत्पादकांना लवकरात लवकर स्वच्छ आणि पर्यायी इंधनाकडे वळण्याचे आवाहन केले. तसेच हा बदल स्वीकारायची तयारी करण्याचेही आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे.
हायड्रोजनवरील वाहनांची चाचणी
सरकारने हायड्रोजनवर आधारित वाहनांवर काम सुरू केले आहे. देशातील अनेक मार्गांवर हायड्रोजन बस आणि ट्रकची चाचणी सुरू आहे. यामध्ये टाटा मोटर्स, व्होल्वो, अशोक लेलँड आणि महिंद्रा यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. सरकारचा विश्वास आहे की, भविष्यात हायड्रोजन इंधन एक प्रमुख इंधन पर्याय बनू शकते, जे पर्यावरणासाठीही चांगले असेल, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
इलेक्ट्रिक बसची वाढती मागणी
नितीन गडकरी म्हणाले की, पुढील तीन वर्षांत देशाला सुमारे दीड लाख इलेक्ट्रिक बसची गरज भासू शकते. परंतु सध्याला उत्पादन क्षमता अजूनही खूप कमी आहे. त्यांनी कंपन्यांना उत्पादन वाढवण्यावर, गुणवत्ता सुधारण्यावर आणि प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा पुरवण्यावर भर देण्यास सांगितले आहे. यासोबतच, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी बसमध्ये सहज चढण्या-उतरण्याची प्रणाली (जसे की हायड्रॉलिक प्रणाली) लागू करण्यासही सांगण्यात आले.
इथेनॉल-फ्लेक्स-फ्यूएलवर भर
मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन देण्याचेही सांगितले आहे. सध्या पेट्रोलमध्ये 20 टक्केपर्यंत इथेनॉल मिसळले जात आहे आणि आता सरकार फ्लेक्स-फ्यूएल इंजिनला प्रोत्साहन देत आहे. फ्लेक्स-फ्यूएल इंजिन म्हणजे असे इंजिन जे पेट्रोल आणि इथेनॉल यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनावर चालू शकतात. यामुळे आयात केलेल्या तेलावरील अवलंबित्व कमी होईल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल.