ब्ल्यू फ्लॅग प्रकल्पाच्या विस्ताराला विरोध
चेन्नईत मच्छिमार समुदायाची निदर्शने
वृत्तसंस्था/ चेन्नई
ब्ल्यू फ्लॅग प्रकल्पाचा विस्तार आणि मरीना रोप काच्या विरोधात चेन्नईतील मच्छिमार समुदाय 2 मार्चपासून मानवीसाखळी तयार करत निदर्शने करणार आहे. यामुळे चेन्नईच्या किनारी भागांमध्ये तणाव वाढत चालला आहे. ट्रिप्लिकेनच्या अयोध्या कुप्पम आणि संथोमच्या श्रीनिवासपुरम दरम्यान स्थित 12 गावांमधील मच्छिमारांचा प्रकल्पाच्या विस्ताराला विरोध आहे.
मरीना किनाऱ्यावर ब्ल्यू फ्लॅग प्रकल्पाच्या विस्ताराची योजना रद्द करणे आणि समुद्रकिनाऱ्यावरील रोप कार प्रकल्प रोखण्याची मागणी मच्छिमार समुदाय करत आहे. याचबरोबर मच्छिमार समुदाय मरीना लूप रोड आणि समुद्रकिनारी क्षेत्रांमधील दुकाने हटविण्याच्या प्रस्तावालाही विरोध करत आहे.
आम्ही विकासाच्या विरोधात नाही, परंतु पर्यटन सुविधांचा विस्तार मासेमारीचा अधिकार, विक्रीस्थळे आणि किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याच्या किमतीवर होऊ नये. या प्रकल्पांचे काम सुरु करण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी आमच्यासोबत चर्चा करावी अशी मागणी निदर्शकांनी केली आहे.