कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध कायम
सर्व पक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर
कोल्हापूर शहरालगतच्या गावांचा हद्दवाढीला अद्यापही विरोध कायम आहे. या आधीही २०१७ मध्ये हद्दवाढीचा विषय उपस्थित झाला होता. तेव्हा कोल्हापूर शहरालगत्या गावांचा हद्दवाढीला असलेला विरोध पाहता, राज्य सरकारने २०१७ साली शहरालगतच्या ४२ गावांकरीता कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन केले होते. मात्र गेल्या ६ वर्षात या प्राधिकरणाला एक रुपयाचाही निधी सरकारने दिलेला नाही. यामुळे या गावांचा विकास रखडला आहे. त्यामुळे प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या ४२ गावांच्या विकासकामंसाठी राज्य सरकारने २ हजार कोटींचा निधी द्यावर अशी मागणी हद्दवाढ विरोधी कृती समिती तर्फे करण्यात आली.
या प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या ४२ गावांना मिनी शहर म्हणून विकसित करावं. ग्रामीण भागातील जनतेचा हद्दवाढीला विरोध असल्यानं हद्दवाढी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कृती समितीकडून करण्यात आला.
कृती समितीचे मधुकर चव्हाण म्हणाले, वेळोवेळी सत्ताधारी म्हणतात की आम्ही हद्दवाढ करतो, शहराला जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी आराखडा वाढला पाहिजे, तर आम्ही विकास कामे करु शकतो. मग दोन महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांनी साडे ४ हजार कोटींचा निधी कोल्हापूर विकासाला कसा काय दिला ? हद्दवाढ झाली नसतानाही त्यांनी शहराच्या विकासकामांसाठी निधी दिला असेल तर प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या ४२ गावांनाही त्यांनी २ हजार कोटींचा निधी द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.