For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

नेतान्याहू यांना सत्तेतून हटवण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी

06:32 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेतान्याहू यांना सत्तेतून हटवण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी
Advertisement

आइझेनकोट यांनी मांडल्या आघाडीच्या चार अटी : इस्रायलमध्ये निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा पेच

Advertisement

वृत्तसंस्था, तेल अवीव

इस्रायलमध्ये निवडणुकीनंतर कोणत्याही आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमत मिळालेले नाही. देशाच्या नेसेटमध्ये एकूण 120 जागा असून सरकार स्थापनेसाठी 61 जागांची गरज आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या आघाडीला 53, तर विरोधी आघाडीला 48 जागा मिळाल्या आहेत. अरब पक्षांच्या खात्यात 19 जागा आहेत. गादी आइझेनकोट यांच्या याशार पक्षाने 21 जागा जिंकत विरोधकांमध्ये सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आइझेनकोट यांनी नवे सरकार स्थापन करण्यासाठी चार अटी मांडल्या आहेत. ‘वाय-नेट’ या इस्रायली माध्यमाच्या वृत्तानुसार, या अटी मान्य करणाऱ्या खासदार आणि राजकीय पक्षांसाठी आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचा मार्ग खुला असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

ओळख ज्यू, लोकशाहीवादी देश म्हणून कायम राहावी

इस्रायलची ओळख ज्यू, लोकशाहीवादी आणि उदारमतवादी देश म्हणून कायम राहावी, तसेच सर्व नागरिकांना समान अधिकार मिळावेत, अशी आइझेनकोट यांची पहिली अट आहे. सरकारने ज्यू ओळखीचे जतन करताना लोकशाही आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याचाही आदर करावा, कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या लोकांशी भेदभाव करू नये, अशी त्यांची भूमिका आहे.

सर्व नागरिकांसाठी सैन्य किंवा राष्ट्रीय सेवा अनिवार्य

इस्रायलच्या प्रत्येक नागरिकाने सैन्य, राष्ट्रीय किंवा नागरी सेवा करावी, अशी मागणी आइझेनकोट यांनी केली आहे. हा मुद्दा इस्रायली राजकारणात दीर्घकाळापासून वादाचा विषय आहे. ज्यू नागरिकांसाठी सैन्यसेवा सर्वसाधारणपणे अनिवार्य असली, तरी अतिधार्मिक हरेदी समुदायातील अनेकांना धार्मिक शिक्षणासाठी सैन्यसेवेतून सूट मिळत आली आहे. देशासमोर युद्ध आणि सुरक्षेची आव्हाने असताना सैन्यसेवेची जबाबदारी सर्वांनी उचलावी, असे याशार पक्षाचे म्हणणे आहे.

स्वातंत्र्याच्या घोषणेतील तत्त्वांचे पालन

1948 मध्ये इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या घोषणेत नमूद केलेल्या तत्त्वांनुसार सरकारने काम करावे, अशीही आइझेनकोट यांची अट आहे. ज्यू राष्ट्राची स्थापना, लोकशाही, स्वातंत्र्य, न्याय आणि सर्व नागरिकांना समान अधिकार ही त्या तत्त्वांतील प्रमुख मूल्ये आहेत. नेतन्याहू सरकारच्या काळात न्यायव्यवस्थेतील बदलांवरून वाद निर्माण झाल्याने या अटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

 गाझामधील हमासचे शासन संपवावे

गाझामधील हमासचे शासन संपवून त्याची लष्करी ताकद कमी करावी, अशी आइझेनकोट यांची चौथी अट आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. त्यात अनेक जण मारले गेले आणि काहींना ओलीस ठेवण्यात आले. त्यानंतर इस्रायलने गाझामध्ये लष्करी कारवाई सुरू केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आणि अनेक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. इस्रायलच्या मते, देशाच्या सुरक्षेसाठी हमासची लष्करी ताकद संपवणे आणि त्याला पुन्हा गाझाची सत्ता मिळू न देणे आवश्यक आहे. नव्या सरकारनेही या दिशेने काम करावे, अशी आइझेनकोट यांची अपेक्षा आहे.

सरकार स्थापनेसाठी आइझेनकोट यांची धडपड

इस्रायलमध्ये निवडणुकीनंतर राष्ट्राध्यक्ष सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतात. त्यानंतर एखाद्या खासदाराला सरकार स्थापनेची जबाबदारी दिली जाते. त्या खासदाराला संसदेत विश्वासदर्शक पाठिंबा मिळवावा लागतो. सरकार स्थापनेसाठी सुऊवातीला 28 दिवसांचा कालावधी दिला जातो. गरज पडल्यास राष्ट्राध्यक्ष आणखी 14 दिवसांची मुदत वाढवू शकतात. या काळात संबंधित नेत्याला इतर पक्षांशी चर्चा करून पाठिंबा मिळवावा लागतो. त्यासाठी धोरणे आणि मंत्रिपदांबाबत समझोते होऊ शकतात. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून आइझेनकोट हे नेतन्याहूविरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. अधिकाधिक खासदारांचा पाठिंबा मिळवून राष्ट्राध्यक्ष इसाक हर्जोग यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

याशारच्या खासदारांना फोडण्याचा लिकुडवर आरोप

याशार पक्षाने नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षावर आपल्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. लिकुडचे काही नेते याशारच्या खासदारांना फोन करून नेतन्याहू यांना पाठिंबा देण्यासाठी राजी करत असल्याचा दावा पक्षाने केला. निवडणुकीतील पराभवानंतर लिकुडचे नेते अस्वस्थ झाले असून ते याशारच्या खासदारांशी संपर्क साधत आहेत, असे याशारने म्हटले आहे.खासदारांचा पाठिंबा मिळवून राष्ट्राध्यक्ष इसाक हर्जोग यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Advertisement
Tags :

.