विरोधी पक्षांच्या नेत्यांना भाजप आमंत्रण! राम मंदिरावरून विरोधी पक्ष ‘धर्मसंकटात’
इंडिया आघाडीकडून सामूहिक निर्णय होण्याची शक्यता : डाव्या पक्षांकडून भूमिका जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरूनही राजकारण होऊ लागले आहे. भाजपने सध्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देत गुगली टाकली आहे. यामुळे इंडिया आघाडीच्या अनेक साथीदारांमध्ये राजकीय गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. इंडिया आघाडीच्या 19 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत राम मंदिराचे श्रेय घेण्यापासून भाजपला कशाप्रकारे रोखण्यात यावे या मुद्द्यावरही चर्चा झाली होती. परंतु राम मंदिरावरून भाजपच्या आक्रमक रणनीतिमुळे विरोधी पक्ष चांगलेच कोंडीत सापडले आहेत. कम्युनिस्ट पक्ष वगळता अन्य राजकीय पक्षांना नेमके कुठले पाऊल उचलावे हेच ठरविता आलेले नाही.
राम मंदिराचा मुद्दा भाजप कशाप्रकारे लोकसभा निवडणुकीत उचलणार यासंबंधीची चिंता सर्वप्रथम माकप नेते सीताराम येच्युरी यांनी व्यक्त केली होती. राम मंदिराच्या मुद्द्यावर एक काउंटर स्ट्रॅटेजी तयार करण्याचे आवाहन त्यांनी इंडियाच्या बैठकीत सर्व साथीदारांना केले होते. परंतु विरोधी पक्षांनी यासंबंधी संयुक्त रणनीति निश्चित करण्यापूर्वीच डाव्या पक्षांच्या वतीने माकप नेत्या वृंदा करात यांनी आमचा पक्ष अयोध्येतील सोहळ्यात सामील होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
होकारातच नकार दडलेला
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केलेले वक्तव्य पाहता त्यांचा राजकीय गोंधळ दिसून येतो. राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने आमंत्रित केल्यास प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अवश्य सामील होईन असे अखिलेश यांनी म्हटले होते. तर पक्षाच्या अन्य नेत्यांनी केलेली वक्तव्ये ही याच्या विरोधात होती. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिनी मी बाबरी मशिदीसाठी प्रार्थना करणार असल्याचे सप खासदार शफीकुर्रहान बर्क यांनी म्हटले आहे. अशा स्थितीत अखिलेश हे निमंत्रण मिळाले नसल्याचे निमित्त पुढे करत सोहळ्यापासुन अंतर राखू पाहत असल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी अखिलेश यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अखिलेश यांनी भेटीसाठी वेळ न दिल्यास पोस्टाच्या माध्यमातून आमंत्रणपत्रिका पाठवू असे आलोक कुमार यांनी म्हटले आहे. तर सुप्रिया सुळे यांनी आमंत्रण मिळाल्यावर कोणता निर्णय घ्यायचा हे ठरवू असे म्हणत भूमिका स्पष्ट करणे टाळले आहे.
काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात
अयोध्येतील सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी यांनाही निमंत्रण पाठविण्यात आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांचाही निमंत्रितांमध्ये समावेश आहे. परंतु काँग्रेसचे नेते या सोहळ्यात सामील होणार की नाही हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. तेलंगणात मुस्लीम समुदायाने बीआरएसऐवजी काँग्रेसच्या बाजूने मतदान केल्याचे मानले गेल्याने पक्ष या सोहळ्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे.
इकडे आड, तिकडे विहीर
इंडिया आघाडीत सामील बहुतांश पक्ष हे स्वत:ला राम मंदिर आंदोलनापासून दूर ठेवणारे आहेत. राजद आणि सपच्या सरकारांनी राम मंदिर आंदोलनाच्या विरोधात कठोर कारवाई केली होती. 1990 मध्ये रथयात्रेदरम्यान लालकृष्ण अडवाणी यांना बिहारमध्ये अटक करण्यात आली होती. तर उत्तरप्रदेशात 1990 मध्ये कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी दिला होता. परंतु बदललेल्या राजकीय स्थितीत आता प्रत्येक पक्ष आपण हिंदूविरोधी नसल्याचे दाखवून देऊ पाहतोय. खर्गे आणि सोनिया गांधी सोहळ्यात सामील न झाल्यास काँग्रेस हिंदूविरोधी असल्याचा आरोप भाजपकडून केला जाऊ शकतो. सोनिया गांधी आणि खर्गे सोहळ्यात सामील झाल्यास आणि अखिलेश आणि मायावती सोहळ्यापासून दूर राहिल्यास काँग्रेसला मुस्लीम मतपेढी स्वत:पासून दूरावेल अशी भीती वाटत आहे. हीच स्थिती नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचीही आहे.