विरोधी पक्षांची बोरा यांच्यावर टीका
ब्राम्हणविरोधी वक्तव्यामुळे दुफळी झाली उघड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या आणि अलिकडच्या काळात काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात आघाडीवर दिसून येणाऱ्या नेहा बोरा अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. ब्राम्हण पुजारी मंदिरांमध्ये बलात्कार करतात. ब्राम्हणवाद घातक असून तो संपला पाहिजे, अशी वादग्रस्त आणि उपमर्दकारक विधाने त्यांनी नुकतीच केली आहेत. त्यांच्या या विधानांमुळे विरोधी पक्षांचीच कोंडी होत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीतील अनेक पक्षांनी त्यांच्यावर या विधानांमुळे टीका केली आहे.
काँग्रेसने 31 ऑक्टोबरला मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आयोजित केलेला ‘मॉक इंपिचमेंट कार्यक्रम’, तसेच त्यापूर्वी काँग्रेसने आयोजित केलेला सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चा आणि रविवारी दिल्लीतील मोर्चा, तसेच रामलीला मैदानावरील सभा या कार्यक्रमांमध्ये त्या आघाडीवर दिसत होत्या. त्यांना काँग्रेसने ही संधी दिल्यामुळे त्या प्रकाशझोतात आल्या आहेत. तथापि, आता त्यांनी ब्राम्हणांविरोधात वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांनीही त्यांच्यापासून अंतर राखण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. समाजवादी पक्षाचे नेते राजीव राय यांनी, त्यांच्या या विधानाचा समाजवादीं पक्षाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही जातीत किंवा धर्मात चांगली आणि वाईट माणसे असतात. त्यामुळे संपूर्ण समाजाला अशा प्रकारे वाईट ठरविणे चुकीचे आहे. समाजवादी पक्ष अशा विचारांचे समर्थन करत नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
उबाठा शिवसेनाही नाराज
विरोधी पक्षांच्या आघाडीतील आणखी एक पक्ष उबाठा शिवसेनेही या विधानांमुळे बोरा यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. या पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी बोरा यांच्या विधानांशी आपला पक्ष सहमत नाही, असे वक्तव्य केले आहे. नेहा बोरा यांची विधाने दुर्दैवी आहेत. उजव्या किंवा डाव्या अशा दोन्ही विचारसरणींपैकी कोणतीही मानणाऱ्या व्यक्तींनी अतिरेकी विधाने आणि आंधळी टीका कोणत्याही समाजघटकावर करु नये. ते धर्मनिरपेक्ष विचारसरणीसाठी घातक आहे, अशा अर्थाची टीका प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे. नेहा बोरा यांनी केलेल्या विधानांच्या संदर्भात काँग्रेसने मात्र अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.