For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विरोधी आमदारांचे विधानसभेत अहोरात्र धरणे

06:11 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
विरोधी आमदारांचे विधानसभेत अहोरात्र धरणे
Advertisement

भाजप, निजद आमदार अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

विधानसभेत मंगळवारी अबकारी खात्यातील कथित भ्रष्टाचाराचे पडसाद उमटले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी अबकारी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सभाध्यक्षांनी रात्री अबकारी मंत्र्यांकडून भ्रष्टाचार प्रकरणावर उत्तर दिले जाईल, असे सांगितले. त्यामुळे भाजप व निजद आमदार शांत झाले. रात्री 8 वाजता अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी दिलेल्या उत्तरावर समाधान न झाल्याने विरोधी आमदारांनी विधानसभेत अहारोत्र धरणे धरण्याची घोषणा केली. त्यामुळे सभाध्यक्षांनी कामकाज बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत तहकूब केले.

Advertisement

मंगळवारी विधानसभेच्या कार्यसूचीमध्ये प्रारंभी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे व्हीबी-जी राम जी कायद्याला विरोध करणारा आणि मनरेगा योजना पुन्हा जारी करण्याची मागणी करणारा ठराव मांडणार होते. परंतु, विरोधी पक्षांनी आधी अबकारी खात्यातील भ्रष्टाचारावर सभागृहात चर्चा घडवून आणावी, अशी मागणी केली. ही चर्चा झाल्यानंतरच व्हीबी-जी राम जी कायद्याचा मुद्दा उपस्थित करावा, अशी मागणी केली. अखेर विरोधी आमदारांच्या दबावामुळे सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी अबकारी खात्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आधी चर्चा करण्याची परवानगी दिली. त्यामुळे विधानसभेच्या कामकाजाला सकाळी 10 ऐवजी 11:45 वाजता प्रारंभ झाला.

मंगळवारी सकाळी कामकाजाला सुरुवात होताच विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी अबकारी खात्यात कसा भ्रष्टाचार झाला, यावर विस्तृत माहिती दिली. तसेच लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांची ध्वनिफित असणारे पेनड्राईव्ह विधानसभेत सादर केले. यावरून अबकारी खात्यातील भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. आणखी पुराव्यांची आवश्यकता नाही. भ्रष्टाचारात मंत्री आर. बी. तिम्मापूर यांचा सहभाग आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

आर. अशोक बोलत असताना सत्ताधारी काँग्रेसचे आमदार ए. एस. पोन्नण्णा यांनी आक्षेप घेतला. तेव्हा विरोधी पक्षातील आमदारांनी घोषणाबाजी केली. तेव्हा अशोक यांनी लाच घेताना लोकायुक्त जाळ्यात अडकलेल्या अबकारी उपायुक्त नागराजप्पा यांचे सभाषण असणारी ध्वनिफित दाखविली. त्यातील संभाषण वाचून दाखविले. तेव्हा भाजपचे आमदार व्ही. सुनीलकुमार यांनी सरकारला मानसन्मान आहे की नाही? अबकारी खात्यात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट असताना चर्चेची गरज आहे का?, असा प्रश्न केला. आधी तिम्मापूर यांचा राजीनामा घ्या, अशी जोरदार मागणी केली. तेव्हा सत्ताधारी काँग्रेस आमदारांनी आक्षेप घेतला. यावेळी सत्ताधारी-विरोधी आमदारांना शाब्दिक चकमक झाली. सभागृहात गोंधळ माजला. तेव्हा सभाध्यक्षांनी रात्री अबकारी मंत्र्यांकडून उत्तर दिले जाईल, असे सांगितल्यानंतर विरोधी पक्षातील आमदार शांत झाले.

रात्री आरोपांवर उत्तर देताना मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी, मी कोणतीही चूक केलेली नाही, त्यामुळे राजीनामा देणार नाही, अशी ठाम भूमिका केली. या भूमिकेचे सत्ताधारी आमदारांनी समर्थन केले, तर विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्षेप घेतला. यावेळी भाजप व निजद आमदारांनी आक्रमक भूमिका घेत सभाध्यक्षांच्या आसनासमोर धरणे धरणे. त्यामुळे सभाध्यक्षांनी कामकाज बुधवारी सकाळी 10 पर्यंत तहकूब केले. नंतर विरोधी आमदारांनी रात्रभर सभागृहातच धरणे धरण्याचा निर्णय घेतला.

मी राजीनामा देणार नाही!

मी सत्तेत येण्यापूर्वी अबकारी खात्यात अनेक भ्रष्टाचार होते. ते थांबविण्यासाठी ती पारदर्शक प्रशासनावर भर दिला. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पुढे आल्याने माझ्यावरच निराधार आरोप केले जात आहे. अशा आरोपांना मी घाबरत नाही. मी राजीनामा देणार नाही.

- आर. बी. तिम्मापूर, अबकारी मंत्री

Advertisement
Tags :

.