सभापतींसमोरील हौदात विरोधकांचा ठिय्या
पणजी : चिंबल येथील प्रस्तावित ‘युनिटी मॉल’ प्रकल्प कायमचा रद्द करण्याच्या मागणीसाठी चिंबल ग्रामस्थांनी आरंभलेल्या आंदोलनाचे पडसाद गुऊवारी विधानसभा कामकाजात उमटले आणि विरोधकांनी सभापतींच्या समोरील हौदात उतरून ठिय्या दिला. हे आंदोलन सध्या निर्णायक वळणावर पोहोचले आहे. त्यातूनच गुऊवारी आंदोलकांनी विधानसभेवर मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी तो अडविल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मेरशी जंक्शनवरच ठाण मांडले. त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात ठोस आश्वासन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र तसे कोणतेही वक्तव्य करण्यापेक्षा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी युनिटी मॉलसंदर्भात यापूर्वीच आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असल्याचे सांगितले.
त्याशिवाय आंदोलकांशी कालपासूनच चर्चा झाली आहे व आजही चर्चेस तयार आहे, त्यांनी पुढे यावे, असे त्यांनी पुढे सांगितले. परंतु त्यातून समाधान न झालेल्या विरोधकांनी थेट सभापतींच्या हौदानजीक धाव घेतली व मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन देण्याची मागणी केली. ती मागणी पूर्ण होईपर्यंत तेथून न हटण्याचा निर्धार करत त्यांनी तेथेच ठिय्या दिला. ‘आमकां नाका युनिटी मॉल’, अशा घोषणाही त्यांनी दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री आसनावरून उठून बाहेर गेले व लगेचच परत येताना त्यांनी युनिटी मॉल रद्द करावा की काय यासंबंधी कायदेतज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. सध्या पोलिसांनी कोणत्याही आंदोलनकर्त्याला अटक केलेली नाही. काही महिला स्वत:च पोलिसांच्या वाहनात घुसल्या व गोंधळ सुरू केला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यावर समाधान झालेले विरोधक नंतर आपापल्या आसनाकडे परतले.