विरोधकांचा हल्लाबोल, सावईकर मात्र ठाम
नरेंद्र सावईकरांच्या ‘वाळवी’ पोस्टवरुन वादंग : काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप, आरजीकडून टीका
त. भा. प्रतिनिधी
पणजी : भाजपचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी दिल्लीत झालेल्या युवकांच्या मोर्चाला ‘वाळवी’ असे शब्द (पोस्ट) सोशल मीडियावर वापरल्यानंतर गोव्यात राजकीय धुरळा उडाला. काँग्रेससह गोवा फॉरवर्ड, आप, आरजी या विरोधी पक्षांनी त्यावर हल्लाबोल करताना तिखट प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
... अन्यथा आंदोलन : कवठणकर
सावईकर यांच्या पोस्टमुळे देशातील सर्व तरुणांचा अपमान झाला असून त्यांनी 24 तासात माफी मागावी नाही तर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुनिल कवठणकर यांनी दिला आहे. युवावर्ग जागा होऊन आपल्या भवितव्यासाठी आवाज उठवत असून त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी तो दडपून टाकण्याचे काम भाजप सरकारने चालवले आहे, असे ते म्हणाले.
युवाशक्तीचा अपमान : युरी आलेमांव
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी भाजपने युवाशक्तीचा अपमान केल्याचे सांगून तो निंदनीय ठरल्याचे वक्तव्य केले आहे.
‘वाळवी’ म्हणणे चुकीचे : वीरेश बोरकर
तरुण शक्ती म्हणजे युवक हे राष्ट्राची ताकद असून देशाचे भवितव्य त्यांच्या हातात आहे. त्यांना ‘वाळवी’ म्हणून हिणवणे चुकीचे असून सावईकरांनी माफी मागावी, असे निवेदन आरजी पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी केले.
काँग्रेस युवकांच्या पाठीशी : फर्नांडिस
भाजप सरकारने दिल्लीत तरुणांवर विनाकारण मारबडव केली. त्यांना न्याय दिला पाहिजे. काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे खासदार विरियातो फर्नांडिस म्हणाले.
वाळवी म्हणचे चुकीचे : अमित पालेकर
युवा शक्तीला वाळवी म्हणणे चुकीचे, अन्यायकारक असून तेच तुमचे उद्याचे भविष्य घडवणार असल्याचे काँग्रेस नेते अमित पालेकर यांनी नमूद केले.
त्याच नजरेने बघता का? : अर्चित नाईक
गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक यांनी देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सावईकर जेव्हा देशातील युवकांना ‘वाळवी’ म्हणतात तेव्हा ते अभाविप व भाजयूमोमधील तरुणांना त्याच नजरेने बघतात काय? अशी विचारणा नाईक यांनी केली.
झुरळ, वाळवी घातकच : कुंकळ्योकर
विरोधी पक्षातील विविध नेते भाजप व सावईकर यांच्याविरोधात हल्लाबोल करीत असताना भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्योकर यांनी मात्र सावईकरांच्या पोस्टचे समर्थन केले. ते म्हणतात, झुरळ-वाळवी हे दोन्ही किटकच असून ते वाईटच आहेत. त्यांचा नाश करायला हवा आणि देशाचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे कुंकळ्योकर यांनी मत मांडले.
हा युवकांचा अपमानच : वॉरन आलेमांव
वॉरन आलेमांव यांनी आक्रमक होताना सांगितले की, देशातील युवक हक्कासाठी झगडत असताना त्यांना ‘वाळवी’ म्हणणे हा अपमानच आहे. त्यावर सावईकर यांनी माफी मागावी नाहीतर गोव्याचे युवक सावईकरांच्या घरावर मोर्चा काढतील, असे त्यांनी बजावले.
विजय सरदेसाईंकडूनही निषेध
आमदार विजय सरदेसाई यांनी सावईकरांच्या वाळवी पोस्टचा जोरदार शब्दात निषेध केला. तरुणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांना वाळवी म्हणणे म्हणजे मोठा अपमान असल्याचे सरदेसाई म्हणाले.
वाळवी - झुरळे घर पोखरतात हे सत्यच : सावईकर
नरेंद्र सावईकर हे आपल्या पोस्टबाबत ठाम राहिले असून त्यात आपण कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीचा उल्लेख केलेला नाही. तो पोस्ट झुरळ-वाळवी या किटकांसाठी होता आणि त्यांच्यापासून आपण सावध राहून काळजी घेणे आवश्यक आहे, एवढेच सूचवायचे होते. ‘कॉक्रोचेस विथ द टर्माइटस! सेव्ह द नेशन’ अशा शब्दात सावईकर यांनी पोस्ट करुन भारत नकाशाला झुरळे-वाळवी पोखरत असल्याचे चित्र त्यात दाखवण्यात आले होते. वाळवी-झुरळे घर पोखरतात हे सत्य आपणास दाखवायचे होते. दिल्ली आंदोलनाशी त्या पोस्टचा काहीच संबंध नाही. पण तसा कोणी संबंध जोडत असतील तर आपण काही करु शकत नाही, असे सावईकर यांनी नमूद केले आहे.