For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विरोधकांकडून राज्यपालांना ‘बर्च’ अग्नितांडवावर बोलण्याचा आग्रह

12:43 PM Jan 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
विरोधकांकडून राज्यपालांना ‘बर्च’ अग्नितांडवावर बोलण्याचा आग्रह
Advertisement

राज्यपालांच्या अभिभाषणावेळी घातला गोंधळ : ‘शेम शेम’च्या घोषणांनी सरकारचा केला निषेध,मार्शलांनी सातही विरोधी आमदारांना काढले बाहेर

Advertisement

पणजी : राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या काल सोमवारी विधानसभेतील अभिभाषणाच्या वेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी हडफडे येथे 25 जणांचे बळी गेलेल्या ‘बर्च’ अग्नितांडवाचा ज्वलंत विषय मांडला. त्यांच्यासह इतर विरोधी आमदारांनी हातात फलक घेऊन सभागृहात ‘शेम शेम’च्या घोषणा दिल्या. सभापती गणेश गांवकर यांच्या आसनासमोर येऊन त्यांनी सरकारचा निषेध करुन आवाज उठवल्याने शेवटी सभापतींच्या आदेशानुसार सात विरोधी आमदारांना मार्शल आणि सुरक्षारक्षकांच्या मदतीने सभागृहाबाहेर काढण्यात आले. राज्यपालांचे अभिभाषण चालू असतानाच त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला. हे सर्व होत असताना राज्यपालांनी आपले अभिभाषण चालूच ठेवले. या प्रकरणामुळे सभागृहात गोंधळ माजला. ‘बर्च’ दुर्घटनेवर बोला, अशी विरोधकांची मागणी होती.

सरकारने केलेले खून : आलेमांव

Advertisement

राज्यपाल अभिभाषणासाठी उभे राहिले आणि ते आपले बोलणे सुरु करणार इतक्यात आलेमांव यांनी आपले भाषण सुरु केले. हडफडेच्या बर्च दुर्घटनेत 25 जणांचा बळी गेला. हे सरकारने केलेले खून आहेत. त्याला जबाबदार कोण? अशी विचारणा आलेमांव यांनी केली.

आलेमांवना रोखण्याचा प्रयत्न 

सभापती तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आलेमांव यांना रोखण्याचा प्रयत्न केला. अभिभाषणात राज्यपालांना अडथळा आणू नका, शांत जागेवर बसा, असेही त्यांनी सांगितले. तेवढ्यात राज्यपालांनी देखील आपले अभिभाषण सुरु केले. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कोण काय बोलतोय तेच कळेनासे झाले.

आसन सोडून घोषणाबाजी

बर्च दुर्घटनेवर बोला, अशी मागणी करत युरी आलेमांव यांच्यासह विजय सरदेसाई, क्रूझ सिल्वा, व्हेन्झी व्हिएगश, वीरेश बोरकर, कार्लोस फेरेरा व अॅल्टॉन डिकॉस्ता या सात आमदारांनी बर्च दुर्घटनेचे फलक बाहेर काढून ते समोर धरले. बर्चप्रकरण आणि इतर विषयांवर बोला अशी मागणी आलेमांव यांनी केली. शेवटी त्यांच्यासह वरील सर्व सात आमदारांनी आसन सोडले आणि त्यांनी सभापतींसमोर जाऊन ‘शेम शेम’ची घोषणाबाजी केली. या गोंधळातही राज्यपालांचे भाषण सुरुच होते.

कामकाजात 45 मिनिटांची वाढ

विरोधी आमदार ऐकत नसल्यामुळे शेवटी त्यांना सभागृहाबाहेर काढण्याची सूचना सभापतींनी केली आणि त्यांना बाहेर काढल्यानंतर हा गोंधळ शांत झाला. जवळजवळ 2 तासाहून अधिक वेळ सभापतींनी अभिभाषण केले. त्यासाठी सभागृहाचे कामकाज 45 मिनिटांनी वाढवणे भाग पडले.

Advertisement
Tags :

.