राहुल-प्रियंका, अखिलेश यादव ताब्यात : दोन तासांनंतर सुटका ; आंदोलनावेळी 2 महिला खासदार बेशुद्ध
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
एसआयआर आणि ‘मतचोरी’ विरोधात आावाज उठविण्यासाठी सोमवारी काँग्रेससह विरोधकांनी निवडणूक आयोग कार्यालयावर मोर्चा काढला. निवडणुकीत मतदार पडताळणी आणि मतचोरीच्या आरोपावरून करण्यात आलेल्या या आंदोलनात विरोधी पक्षाचे जवळपास 300 खासदार सहभागी झाले होते. यादरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर त्यांना दोन तासांनंतर सोडण्यात आले.
निषेधादरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिताली बाग आणि महुआ मोईत्रा यांची प्रकृती बिघडली. त्या बेशुद्ध पडल्या. राहुल गांधी आणि इतर खासदारांनी त्यांना मदत केली. तत्पूर्वी, दोन्ही सभागृहात या मुद्यावर मोठा गोंधळ झाला. ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. ही ‘एक व्यक्ती-एक मता’ची लढाई असून आपल्याला स्पष्ट मतदारयादी हवी आहे, असे ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले. तर, प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकार घाबरले असल्याचा दावा केला. मोर्चाच्या दरम्यान अखिलेश यादव यांनी बॅरिकेड ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
खासदारांना पुढे जाऊ दिले नाही तेव्हा त्यांनी जमिनीवर ठाण मांडले. प्रियंका, डिंपल यांच्यासह अनेक खासदार ‘वोट चोर गड्डी सोड’ अशा घोषणा देत असल्याचे दिसून आले. संसदेपासून निवडणूक आयोगाकडे जाणारा मोर्चा दिल्ली पोलिसांनी रोखला. यादरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव पोलिसांच्या बॅरिकेड्स ओलांडून पुढे जात असताना त्यांना रोखण्यात आले. अखिलेश यादव यांनी पोलिसांच्या कारवाईवर टीका केली आहे. आम्हाला रोखण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला जात आहे. पोलीस विरोधी पक्षाच्या खासदारांना निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढण्यापासून रोखत असताना आणि ते निषेध करण्यासाठी धरणे धरून बसले असताना त्यांनी ही टिप्पणी केली.
खासदारांचा विनापरवानगी मोर्चा : पोलीससंसदेच्या मकर द्वारपासून मोर्चा सुरू झाला. खासदारांच्या हातात ‘वोट वाचवा’ अशा आशयाचे बॅनर होते. याबत बोलताना दिल्ली पोलिसांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने मोर्चासाठी कोणतीही परवानगी मागितली नव्हती, म्हणून निवडणूक आयोगाकडे जाण्यापूर्वीच ट्रान्सपोर्ट भवनजवळ बॅरिकेड्स लावून मोर्चा थांबवण्यात आला, असे स्पष्टीकरण दिले आहे.