भ्रष्ट कारभाराविरोधात विरोधी गट आक्रमक
महापालिका प्रवेशद्वारावर छेडले ठिय्या आंदोलन : संबंधितांची चौकशी करून कारवाई
बेळगाव : महापालिकेच्या महसूल विभागातील भ्रष्ट कारभार आणि अशोकनगर येथील महसूल निरीक्षकांच्या मनमानी कारभाराविरोधात शुक्रवारी विरोधी गटाच्यावतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून निषेध करण्यात आला. महापालिकेच्या महसूल विभागात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. मुख्य कार्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करत आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून नागरिकांची कामे करून देण्यास चालढकल केली जात आहे.
सरकारच्या सूचनेनुसार ई-आस्थी अंतर्गत शहरातील मिळकतींची नोंदणी करून घेतली जात आहे. मिळकतधारकांना ए आणि बी खात्याचे वितरण केले जात आहे. मनपाच्या मुख्य कार्यालयातील कामाचा ताण कमी व्हावा, यासाठी विविध प्रभागांमध्ये अर्ज स्वीकारले जात आहेत. ई-आस्थी अंतर्गत खात्यांची नोंद करून घेऊन उताऱ्यांचे वितरण करण्याऐवजी मिळकतधारकांचे अर्ज अधिकारी व कर्मचारी आपल्याकडेच ठेवून घेत आहेत. अर्जांची विचारणा केली असता पैशांची मागणी केली जात आहे. याबाबत नागरिक नगरसेवकांकडे तक्रार करत आहेत. मात्र, महसूल अधिकारी व कर्मचारी नगरसेवकांची कामे देखील करून देण्यास धजावत नाहीत. एखाद्या एजंटाकरवी फाईल दिल्यास तिचा तातडीने निपटारा केला जात आहे. त्यामुळे महापालिकेत एजंटराज वाढले असून महसूल विभाग भ्रष्टाचाराने बरबटला आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून अधिकारी एकाच पदावर कार्यरत आहेत. अशा अधिकाऱ्यांची बदली करून त्यांच्याजागी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. त्याचबरोबर भ्रष्टाचारात बरबटलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अलीकडेच अशोकनगर येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, सदर महसूल निरीक्षकाकडून नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. लोकांची कामे करून देण्यास विनाकारण विलंब केला जात आहे. त्यामुळे संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी महापालिका विरोधी गटाचे नेते मुजम्मील डोणी, रवी साळुंखे, वैशाली भातकांडे, ज्योती कडोलकर, अफ्रोज मुल्ला, खुर्शिद मुल्ला, शिवाजी मंडोळकर, रेश्मा भैरकदार, शाहीदखान पठाण यांच्यासह विरोधी गटातील नगरसेवक उपस्थित होते.