25-26 ऑगस्टला मुंबईत ‘इंडिया’ची तिसरी बैठक
उद्धव ठाकरे-शरद पवार गट करणार आयोजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विरोधी आघाडी ‘इंडिया’ची तिसरी बैठक 25-26 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे. काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेना (युबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने संयुक्तपणे या बैठकीचे आयोजन केले आहे. मागील बैठकीत जवळपास 26 पक्षांचे नेते उपस्थित होते. आता पुढील बैठकीला आपली ताकद आणखी वाढविण्याचे प्रयत्न विरोधी आघाडीकडून केले जाण्याची शक्यता आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पाटणा येथे विरोधी पक्षांची पहिली बैठक जून महिन्याच्या अखेरीस झाली होती. त्यानंतर दुसरी बैठक बेंगळूर येथे झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्त्व आणि कर्नाटकातील नेत्यांच्या पुढाकाराने या बैठकीची संपूर्ण व्यवस्था व नियोजन पाहिले होते. आता महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्या माध्यमातून मुंबईत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या तिसऱ्या बैठकीत अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रित केले जाऊ शकते.
23 जून रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विऊद्ध एकत्रित लढा देण्यासाठी 15 भाजप विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची पहिली बैठक पाटणा येथे आयोजित केली होती. यानंतर, 17-18 जुलै रोजी बेंगळूर येथे झालेल्या बैठकीत 26 पक्षांनी भाग घेतला होता. या बैठकीतच आघाडीचे नामकरण ‘इंडिया’ असे करण्यात आले होते. आता पुढील बैठकीत लोकसभा निवडणूकविषयक प्रत्यक्ष रणनीती ठरविली जाऊ शकते.