For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

8 जूनला विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
8 जूनला विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक
Advertisement

तृणमूलमधील बंडाची पार्श्वभूमी : बैठकीत होणार महामंथन

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडी’ची 8जून रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी आणि पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी सामील होणार आहेत. बंगाल निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांनी वारंवार विरोधी पक्षांना एकजूट व्हाव लागेल आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीला विचारात घेत एक नवी राजकीय लढाई सुरू करावी लागेल असा पुनरुच्चार केला आहे. भाजप विरोधातील या राजकीय लढाईसाठी इंडी आघाडी एका व्यासपीठाप्रमाणे काम करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Advertisement

इंडी आघाडीच्या बैठकीच्या तारखेवरून अनेक दिवसांपासून अनिश्चितता कायम होती. प्रथम ही बैठक 2 जून रोजी प्रस्तावित होती, परंतु काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्या दिवशी बैठकीत सामील होऊ शकणार नसल्याचे कळविले होते. त्यानंतर परस्पर विचारविनिमयानंतर या बैठकीसाठी 8 जून ही तारीख निश्चित करण्यात आली. ही बैठक समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा कोलकाता दौरा आणि बॅनर्जी यांची त्यांनी घेतलेल्या भेटीनंतर आयोजित होणार आहे. या भेटीकडे निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या एकतेला मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा संकेत म्हणून पाहिले गेले होते.

30 मे रोजी सोनारपूर येथे अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्यानंतर इंडी आघाडीत चांगल्या ताळमेळीचे संकेतही दिसून आले हेते. काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,  सप अध्यक्ष अखिलेश यादव, आप संयोजक अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे अभिषेक बॅनर्जी यांच्याबद्दल एकजूटता व्यक्त केली होती. तर अभिषेक यांनी या नेत्यांच्या संदेशाना री-पोस्ट करत त्यांचे आभार मानले होते. यामुळे तृणमूलचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी पक्षांसोबत ताळमेळ निर्माण करण्यासाठी उत्सुक असल्याची धारणा मजबूत झाली आहे.

Advertisement
Tags :

.