कला अकादमीवरून विरोधकांचा पुन्हा सावंत सरकारवर हल्लाबोल
मात्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बाळगले मौन : कला अकादमीच्या दुरुस्तीत अनेक त्रुटी
पणजी : पणजीच्या कला अकादमीत रविवारी ‘पुरुष’ नाटकाच्यावेळी प्रकाश योजनेचा जो खेळ आणि घोळ झाला त्याबाबत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला असून राज्यातील कलाकारांनी देखील या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मात्र यावर प्रतिक्रिया न देता मौन पाळले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणतात की, कला अकादमी आणि कलाकारांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाहीच. तेथे अनेक समस्या असून त्याकडे वारंवार लक्ष वेधण्यात आले परंतु सरकारने दुर्लक्ष केले. कला अकादमीच्या दुरुस्तीत अनेक त्रुटी राहिल्या असून ‘पुरुष’ नाटकाच्या वेळी जो प्रकार घडला तो गोव्यासाठी लज्जास्पद आहे. या घोळास जे जबाबदार आहेत त्यांची चौकशी करावी, अशी मागणी आलेमाव यांनी केली आहे.
आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी सांगितले की, कलाकारांसाठी ही लज्जेची गोष्ट आहे. त्यांच्या कार्यक्रमात जर असा व्यत्यय आला तर ते गोव्यातून वाईट अनुभव घेऊन जातील आणि गोव्याची आणखी बदनामी होईल म्हणून सरकारने यात लक्ष घालावे. जबाबदार असणाऱ्यांना शोधून काढावे असे परब यांनी सांगितले. आपचे गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पालेकर म्हणतात की, हा प्रकार गोव्यातील कला क्षेत्रासाठी वाईट असून कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याची जबाबदारी घेत नाहीत याचे वाईट वाटते. या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे तसेच एफआयआर नोंदवा असे पालेकर म्हणाले. सिसिल रॉड्रिग्स यांनी तर या प्रकाराची जबाबदारी घेऊन मंत्री गावडे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. राज्यातील काही प्रमुख कलाकारांनी देखील या प्रकाराचा निषेध नोंदवला असून अकादमीसाठी नेमलेल्या समितीकडेही सरकारने दुर्लक्ष केले असल्याचे म्हटले आहे.