For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेर्णा पठारावर ‘सनबर्न’ला विरोध

12:58 PM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
वेर्णा पठारावर ‘सनबर्न’ला विरोध
Advertisement

लोटलीच्या खास ग्रामसभेत एकमताने ठराव: सरकार सनबर्नला प्रोत्साहन देत असल्याची टीका

Advertisement

मडगाव : यंदा ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन वेर्णा पठारावर करण्यासाठी आयोजक धडपड करीत आहेत. या ठिकाणी आयोजकांनी भेट देऊन पाहणी केली होती. मात्र, वेर्णा पठारावर कोणत्याही परिस्थितीत सनबर्नचे आयोजन करू दिले जाणार नसल्याचा इशारा लोटलीच्या ग्रामस्थांनी दिला असून काल रविवारी बोलावलेल्या विशेष ग्रामसभेत सनबर्नला विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. ही खास ग्रामसभा लोटलीचे सरपंच सनफ्रान्सिस्को फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. सनबर्नचे वेर्णा पठारावर आयोजन तसेच वेर्णा पठारावर कचरा प्रकल्प उभारण्यास या ग्रामसभेत विरोध करणारा ठराव घेण्यात आला. त्याचबरोबर रोमी लिपीतील कोंकणीला समान दर्जा देण्याचाही ठराव मंजूर करण्यात आला. सनबर्नचे वेर्णा पठारावर आयोजन करण्याची तयारी सुरू असल्याने लोटली पंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावली होती. जर लोटलीच्या ग्रामस्थांनी सनबर्नला पाठिंबा दिला असता तर ग्रामसभेत तसा ठराव घेतला असता. मात्र, सनबर्नच्या विरोधात लोटलीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी सनबर्नला कडाडून विरोध केला. ज्या हॉलमध्ये ही विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. त्या संपूर्ण हॉलमध्ये तसेच हॉलच्या बाहेर सनबर्नच्या विरोधात पोस्टर लावून लोकांनी सनबर्नच्या विरोधात वातावरण निर्मिती केली होती.

सनबर्न गोव्यात नकोच...

Advertisement

सनबर्नमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षांत ड्रग्सचा ओव्हरडोस झाल्याने युवकांनी आपले प्राण गमावले आहेत. तरीसुद्धा सरकार सनबर्नला प्रोत्साहन देत असल्याबद्दल ग्रामसभेत सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली. वेर्णा असो किंवा लोटली, सनबर्न कुठल्याच परिस्थिती होऊ दिला जाणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

ड्रग्जना सरकारकडून प्रोत्साहन

सनबर्नमुळे युवा पिढी ड्रग्सच्या आहारी जात असल्याने गोव्यात सनबर्न होऊच नये असे मत लोटलीचे माजी सरपंच मारियो परेरा यांनी व्यक्त केले. ड्रग्स आज सर्वत्र पोहोचले आहेत. त्यावर नियंत्रण आणायचे सोडून सनबर्नच्या माध्यमांतून सरकार आणखी ड्रग्स व्यवसायाला प्रोत्साहन देत आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

वेर्णा पठारावर कचरा प्रकल्प नकोच

लोटली पंचायतीने कचरा व्यवस्थापन व्यवस्थित करावे तसेच सासष्टीतील इतर पंचायतींनीदेखील आपापल्या क्षेत्रातील कचरा व्यवस्थापन केल्यास कचरा प्रकल्पाची गरज भासणार नाही, असे मत ग्रामसभेत व्यक्त करण्यात आले. संपूर्ण सासष्टीमधील कचरा वेर्णा पठारावर आणून त्यावर प्रक्रिया करणे म्हणजे लोटली गावासाठी धोक्याची सूचना असल्याचे मत मांडण्यात आले. वेर्णा पठारावर कचरा प्रकल्प नको असल्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. दरम्यान, रोमी लिपीतील कोंकणीला राजभाषेचा समान दर्जा देण्याचा ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला. सरपंच सनफ्रान्सिस्को फर्नांडिस म्हणाले की,सनबर्न तसेच वेर्णा पठारावर कचरा प्रकल्पाला विरोध करणारा ठराव ग्रामस्थांनी घेतला असून त्यांच्या प्रती सरकारला सादर केल्या जाणार आहेत.

Advertisement
Tags :

.