For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अलतगा गायरान जमिनीतील नियोजित प्रकल्पाला विरोध

10:56 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
अलतगा गायरान जमिनीतील नियोजित प्रकल्पाला विरोध
Advertisement

डेब्रिस प्रक्रिया प्रकल्पासाठी जमीन देण्यास ग्रामस्थांचा विरोध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या अलतगा गावातील गायरान जमिनीमध्ये स्मार्ट सिटी योजनेतील डेब्रिस (बांधकाम कचरा) प्रक्रिया प्रकल्प राबविण्यास 5 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. सदर जागा जनावरांसाठी राखीव असून ती जागा देण्यास ग्रामस्थांसह ग्राम पंचायतीने विरोध दर्शविला आहे. ही जागा घेण्यात येवू नये, नियोजित प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अलतगा गावच्या व्याप्तीत येणाऱ्या सर्व्हे क्रमांक 55 मधील 5 एकर जागा डेब्रिस प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेला डेब्रिस बांधकाम कचरा यावर प्रक्रिया करून वाळू व विटा बनविण्याचा हा प्रकल्प आहे. यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार

Advertisement

विशेषकरून कंग्राळी खुर्द, अलतगा व आसपासच्या गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी ही जागा राखून ठेवण्यात आली आहे. 3 हजारांपेक्षा अधिक जनावरे पावसाळ्या दरम्यान चरावयास आणली जातात. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक उपयोग होतो. हा प्रकल्प राबविल्यास जनावरांच्या पालनपोषणाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होणार आहे. प्रदूषण होऊन सदर जागा जनावरे चारविण्यास निरुपयोगी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजित प्रकल्पासाठी निश्चित केलेली जागा रद्द करण्यात यावी. हा प्रकल्प अलतगा गावच्या व्याप्तीमध्ये राबविण्यात येवू नये, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांतर्फे सादर करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे, चंद्रकांत धुडूम, सोमनाथ आलोजी, परशराम चिखलकर, रुपेश चौगुले, हणमंत कंग्राळकर, उमेश चौगुले आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.