भारतीय खेळणी उद्योगाला बहरण्याची संधी
भारताला अमेरिकेकडून इतरांच्या तुलनेत कमी व्यापार शुल्क
मुंबई :
जगातील मजबूत देश अमेरिका सध्याला व्यापार शुल्क आकारणीवरुन चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेवर आता व्यापार शुल्कात कपात करण्याचा दबाव वाढतो आहे. मात्र दुसरीकडे यातही भारताला आता खेळणी उद्योगात विकास साधायची सुवर्णसंधी आली आहे.
भारतीय खेळणी उद्योगाला आगामी काळामध्ये चांगले दिवस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेकडून अलीकडेच इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतावर कमी व्यापारी शुल्काची आकारणी केल्यामुळे खेळणी उद्योगामध्ये भारताला प्रगती करण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. अमेरिकेने भारतावर कररुपी 26 टक्के दर आकारला असून या तुलनेमध्ये अमेरिकेने चीन आणि व्हिएतनाम या देशांवर अधिक कर लावला आहे. परिणामी भारताला खेळणी निर्यातीमध्ये प्रगती साधण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
इतर देशांवरचा कर
व्यापार शुल्काच्या युद्धाता अमेरिकेने व्हिएतनाम देशावर 46 टक्के इतका कर लावला आहे. चीनवर 54 टक्के या आधीच लावला असून आता पुन्हा अमेरिका चीनवर दुप्पट आकारणी करणार आहे. दुसरीकडे इतर देशांचा विचार करता बांगलादेशवर 37 टक्के इतका कर लावला आहे. सोबत इंडोनेशियावर 32 टक्के आणि थायलंडवर 36 टक्के कर अमेरिकेने लावला आहे. सध्याला जागतिक स्तरावर शंभरहून अधिक देशांवर लावलेल्या कराचा विचार करता भारतावरचा कर हा तसा कमीच आहे.
का असणार संधी
या सर्व देशांच्या तुलनेत भारताचा विचार करता भारतावर सर्वात कमी 26 टक्के इतका कर लावला आहे. परिणामी खेळणी निर्यातीमध्ये इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी करामध्ये भारतातील खेळण्यांची अमेरिकेला निर्यात करणे शक्य होणार आहे. व्हिएतनाम हा देश जवळपास 6 अब्ज डॉलरच्या खेळण्याची निर्यात करतो तर चीन हा यामध्ये सर्वात मोठा निर्यातक देश असून 80 अब्ज डॉलरच्या खेळण्यांची निर्यात केली जाते. आता या देशांना त्यांची खेळणी पाठवताना पूर्वीच्या तुलनेमध्ये मोठा कर भरावा लागणार आहे आणि या तुलनेमध्ये भारतातील खेळण्यांना कमी कर द्यावा लागणार असून भारताला या क्षेत्रामध्ये विकासाची संधी प्राप्त होणार आहे.
326 दशलक्ष डॉलर्सची खेळणी अमेरिकेत
भारतातील खेळणी बनवणाऱ्या कंपन्या अचानकपणे जागरूक झाल्या असून त्यांनी आता भारतातील शहरांमध्ये खेळण्यांच्या कारखान्यांचा विस्तार करण्याची योजना बनवली आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पाहता भारताने 326 दशलक्ष डॉलर्स ते 348 दशलक्ष डॉलर्सच्या खेळण्यांची निर्यात केली आहे. आता या निर्यातीत वाढ करण्याची संधी असून परिणामी हे ओळखून येणाऱ्या काळात भारताला खेळण्यांच्या निर्मितीत वाढ करावी लागणार आहे. या क्षेत्रातील कंपन्या आता सजग झाल्या असून त्या कारखाने उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.