नवीन प्रदेशाध्यक्षांपुढील संधी, आव्हाने
भाजपाच्या गोवा प्रदेशाध्यक्षपदासाठी फातोर्डाचे माजी आमदार दामोदर उर्फ दामू नाईक यांची निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. येत्या दोन दिवसात अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांच्यासह तब्बल सहा भाजपा नेते अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. अटीतटीच्या या स्पर्धेत दामू नाईक यांची अटल निष्ठा फळास आली, असे म्हणावे लागेल. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षपदासह जिल्हा व मतदारसंघातील गटाध्यक्षापर्यंत गटबाजी असली तरी निवडणूक मात्र बिनविरोध होते. राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेवर असल्याने या पदाला तसा मोठा मान आहे. अर्थात जेथे सत्ता आहे, तेथे संघर्षही असतोच.
भाजपमध्ये यंदाही गटाध्यक्षापासून जिल्हाध्यक्ष निवडीपर्यंत सर्व पदांची निवड बिनविरोध झाली. प्रदेशाध्यक्षपदही त्याला अपवाद असणार नाही. याचा अर्थ पक्षांतर्गत प्रबळ स्पर्धा, लॉबींग, गटबाजी, हेवेदावे नव्हते असे मुळीच नाही? तरीही मतदानाला फाटा देऊन बिनविरोध निवडीची परंपरा भाजपने यावेळीही राखली आहे. अगदी स्थानिक पातळीपासून राज्य पातळीपर्यंत डिफरन्सीस असले तरी ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ हे ब्रीद वाक्य एका वेगळ्या अर्थाने दिसून आले. गोवा भाजपाचे आगामी प्रदेशाध्यक्ष हे दक्षिण गोव्यातील असतील हे निश्चित झाले आहे. हल्लीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिणेच्या जागेसाठी प्रचंड जोर लावूनही त्यांच्या हातून ही जागा निसटली. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेत संघटन अधिक मजबूत करण्याच्या तयारीने ही निवड भाजपाचे आगामी राजकीय आडाखे दर्शवितात. उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिण गोव्यात विश्वनाथ आर्लेकर व विनय तेंडुलकर या दोघांनीच आतापर्यंत भाजपाचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यातही पक्ष सत्तेवर असताना तेंडुलकर यांच्या वाट्याला हे पद आले होते. दामू नाईक या बहुजन अर्थात भंडारी समाजातील नेत्याकडे ही जबाबदारी सोपवून भाजपा एक नवीन समीकरण जुळवू पाहत असावा. त्याचे दृष्य परिणाम येणाऱ्या काळात दिसून येतील. राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे महत्त्वाचे पद एखाद्या ज्ञाती समाजापुरते मर्यादित नसते, तरी हल्लीच्या राजकारणात हा मुद्दाही तेवढाच निर्णायक ठरू लागला आहे. त्यामुळेच महिला, युवा अशा समित्यांबरोबरच एसटी आघाडीसारख्या समित्या निवडून एकगठ्ठा मतांची मोट बांधण्याच्या व्यावहारिक हिशेबाची गणिते त्यातून मांडता येतात. नियोजित प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आपल्या राजकीय प्रवासात ज्ञाती कार्डचा वापर कधीही केलेला नाही. तरीही येणाऱ्या काळात त्यांना भंडारी तितुका मिळवावा, स्वपक्ष वाढवावा हेही करावे लागेल. तूर्त विविध गटांमध्ये विभागलेल्या व विखुरलेल्या भंडारी समाजाच्या दामू नाईक यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील.
दामू नाईक यांची राजकीय कारकिर्द एक सामान्य कार्यकर्ता ते तऊण नेता अशी आहे. फातोर्डा मतदारसंघातून दोनवेळा आमदार राहिलेल्या या नेत्याने पक्षाशी कायम इमान राखले. पक्षाशी एकनिष्ठ राहून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडली. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये सामान्य कार्यकर्त्यांमधून आमदार बनलेल्या तरुण नेत्यांपैकी दामू नाईक हे एक आहेत. मध्यंतरी सलग दोन निवडणुकांमध्ये अपयश येऊनही पक्षासाठी सतत कार्यरत राहिल्याने व लाभाच्या पदासाठी हटून न बसता पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी तेवढ्याच निष्ठेने पार पाडल्याने त्यांना ही पोचपावती मिळाली असावी. देशभरात भाजपाच्या संघटनांमध्ये फेरबदल घडवताना तरुण व नव्यांना संधी या धोरणाचेही हे फलित असू शकते.
काही दिवसांपूर्वी राज्यातील बहुतेक मतदारसंघात गट समित्यांमध्ये फेरबदल झाले. त्यानंतर जिल्हा अध्यक्षही निवडण्यात आले. ज्या मुख्य पदाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते, ते प्रदेशाध्यक्षपदही निश्चित झाले आहे. मतदारसंघात मंडळ अध्यक्ष निवडताना केडरमधील कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून अन्य पक्षातून भाजपात आलेल्या आमदार, मंत्र्यांच्या मर्जीनुसार अध्यक्ष निवड झाल्याने पक्षात नाराजी आहे. काही ठिकाणी ती उघडपणे दिसून आल्याने जुने-नवे असा भेद करू नका, असे जाहीर आवाहन मुख्यमंत्र्यांना करावे लागले. नवीन प्रदेशाध्यक्षाचे मुकूट डोक्यावर चढवताना सर्वात आधी जुन्या नव्यांचे मनोमिलन घडवून आणणे हा प्राधान्य क्रम असेल. त्यातही दक्षिण गोव्यात त्यांना अधिक जोमाने कार्य विस्तारावर भर द्यावा लागेल.
गोव्यात हे वर्ष जिल्हा पंचायत निवडणुकांचे आहे. डिसेंबरपर्यंत त्या होतील. गोव्यासारख्या छोट्या राज्यात या स्वराज्य संस्थांना तसे विशेष महत्त्व व पुरेसे अधिकारही नाहीत मात्र राजकीय वर्चस्व राखण्यासाठी त्या अधिक प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. विधानसभेची सेमीफायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर नवीन प्रदेशाध्यक्षांची यशापयशाची कसोटी लागणार आहे. जिल्हा पंचायत निवडणुका पक्ष पातळीवर होणार असल्याने पक्षांतर्गत एकाहून अधिक इच्छुक उमेदवार असणे साहजिकच आहे. त्यातही युतीचे घटक असतील. या सर्वांचे हेवेदावे बाजूला करीत अधिकृत उमेदवारासाठी कार्य करण्यास कार्यकर्त्यांना राजी करण्याचे कसबही त्यांना साधावे लागेल.
संघटनात्मक बदल व नवीन पदनियुक्त्या करताना जिल्हा पंचायतीसह येत्या दोन वर्षात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारीही भाजपाने आत्तापासूनच सुरु केलेली आहे. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्षांपुढे निवडणुकीचे हे आव्हान नेतृत्त्व सिद्धतेसाठी एक संधीही ठरणार आहे. त्यातही वैयक्तिक राजकीय कारकिर्दीच्या बाबतीत ही संधी खूप महत्त्वाची आहे. अध्यक्ष म्हणून पक्षाचे कार्य करतानाच सक्रीय राजकारणात आपली प्रतिमा उंचावताना नव्याने सुऊवात करण्यास खूप वाव आहे.
सध्या भाजपामध्ये एकाच झेंड्याखाली तीन गट कार्यरत आहेत याची कल्पना कार्यकर्ते व नेत्यांनाही आहे. सत्तेसाठी स्वीकारलेली ही सोय अंतर्गत संघर्ष सोसून संघटन सुरळीतपणे चालविण्याशिवाय पर्याय नाही. नवीन प्रदेशाध्यक्ष या सर्व गोष्टी कशाप्रकारे हाताळतील यावरून त्यांचे नेतृत्त्व सिद्ध होणार आहे.
सदानंद सतरकर