For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ऑपरेशन टायगर’ पिक्चर तो अभी बाकी है!

06:56 AM Jun 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘ऑपरेशन टायगर’ पिक्चर तो अभी बाकी है
Advertisement

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना इशारा : बाळासाहेबांना अपेक्षित शिवसेना वाढवल्याचा आनंद

Advertisement

प्रतिनिधी. मुंबई

बाळासाहेब ठाकरे यांनी साठ वर्षांपूर्वी ज्या उद्देशाने शिवसेनेची स्थापना केली तो उद्देश गावागावात, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे आवडते उपक्रम गावागावात राबविण्याची ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर ‘टायगर’ तुमच्या समोर उभा असल्याचे सांगत ‘कुत्ते भोकते रहते है और टायगर शिकार करता है’ असे उद्गार काढत शिंदे यांनी ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे संकेतही दिले. त्याचबरोबर ‘पिक्चर अभी बाकी है’ सांगत उद्धव ठाकरेंना आणखी धक्का देण्याचा इरादाही स्पष्ट केला.

Advertisement

शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन सोहळ्यात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदेंची शिवसेना हीच बाळासाहेबांनी स्थापन केलेली खरी शिवसेना हे सिद्ध करण्यात ते पुन्हा एकदा यशस्वी ठरले समजले जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सुरुवातच ‘येथे जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो’ अशी केली. या भाषणाच्या सुरुवातीतूनच त्यांनी लाडक्या बहीण योजनेची ग्वाही दिली. ते म्हणाले, आज साठाव्या वर्षी समोर भगवे वादळ, व्यासपीठावर आमदार, खासदार आणि समोर शिवसेनेची संपत्ती असलेले असंख्य कार्यकर्ते पाहिले की बाळासाहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना आपण जपली आणि वाढवली याचा आनंद होतो. सध्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, हा टायगर आज तुमच्यासमोर उभा आहे. कुत्ते भोकते  रहते है और टायगर शिकार करता है, असे म्हणत त्यांनी ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची जणू घोषणाच केली.

हीच तर शिवसेना आहे, असे म्हणत बाळासाहेबांचे विचार घेऊनच आपण पुढे चाललो आहोत. ‘यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’ म्हणत त्यांनी ठाकरे गटाला अजून हादरे देण्याचा मनसुबा बोलून दाखविला. मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची चळवळ म्हणून शिवसेना उभी राहिली.  बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचा हुंकार, मराठीचा निर्धार, देशद्रोह्यांवर प्रहार आणि सर्वसामान्यांचा आधार, शेतकऱ्यांचा तारणहार आणि शेतकरी, वारक्रयांचा जयजयकार म्हणजे शिवसेना असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यास विसरले नाहीत. बारा वर्षे पंतप्रधानपदाची कारकीर्द, जगातल्या तेहतीस देशांकडून सन्मान हा प्रत्येक भारतीयाचा सन्मान असल्याचे ते म्हणाले. अयोध्येत राममंदिराची उभारणी आणि काश्मीरमधून 370 कलम हटविणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचे महान काम नरेंद्र मोदी यांनी केले, याचा पुरुच्चार केला. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदी आणि अमित शहा यांचे अभिनंदन केले असते. पण देशाला पुढे नेण्याचा संकल्प करणाऱ्यांवर रोज आरोप करण्यात येत आहेत. म्हणून लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.  आपण मात्र बाळासाहेबांना अपेक्षित काम करून शिवसेना गावागावात पोहोचविली आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त आपण त्यांना अभिप्रेत असलेले उपक्रम गावागावात साजरे करून जन्मशताब्दी वर्ष साजरे करू या, असा संकल्प शिंदे यांनी शिवसैनिकांना दिला.

उद्धव नीतीचा समाचार

शिंदे यांनी उद्धव नीतीचा समाचार घेतला. रात्री खासदारांना शिव्या द्यायच्या आणि सकाळी कौतुक करायचे, हे चालते का? सेनापतीने घरात बसून चालत नाही, हा एकनाथ शिंदे लढवय्या आहे. हे काय आम्हाला चॅलेंज देणार? हिंमत असेल तर तुडवायला समोर या. हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवणार नाहीत, असा इशारा दिला. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो, ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब गेल्यानंतर त्यांचा तिरस्कार असलेल्या लोकांचा पुरस्कार तुम्ही केला. शिवसेना पहिल्यांदा फोडली राष्ट्रवादीने, दुसऱ्यांदा काँग्रेसने. ते यांना पुढे करतात आणि ज्याने शिवसेनेचा भगवा यातून मुक्त केला त्याच्यावर टीका करतात, असा टोला त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आमदार आणि मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून कोणाला संधी देणार नाही, तर त्याने कर्तृत्व केले असेल, काम केले असेल तर त्याकडे दुर्लक्षही करणार नाही. पक्ष म्हणजे आमदार-खासदार नाही, मंत्री नाही, तर पक्ष म्हणजे शिवसैनिक आहे. त्यांना जपले पाहिजे. निवडणुकीनंतरही कार्यकर्ता हा आवडताच असला पाहिजे. कार्यकर्ता वाढला पाहिजे, तरच पक्ष वाढेल, असा मंत्र त्यांनी दिला.

फडणवीस-शिंदे एका ध्येयाने एकत्र

आता आनंद दिघे आणि बाळासाहेब हयात नाहीत. पण आज माझे नेते, कार्यकर्ते हेच माझे कुटुंब आहे. देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही एका ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आलो आहोत. राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा असलेला शिवसेना पक्ष आपल्याला अजून लोकांपर्यंत पोहाचवायचा आहे. म्हणून घरात बसून चालणार नाही. शिवसेना मनामनात पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे सांगत त्यांची युवासेनेला कामाला लागण्याचे आवाहन केले.

Advertisement
Tags :

.