ऑपरेशन टायगर तूर्त कठीण
उध्दव ठाकरे यांच्या खासदारांबाबत ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच, त्या पार्श्वभूमीवर रविवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीला चार खासदार प्रत्यक्ष तर पाच खासदार ऑनलाईन हजर राहिल्याने संशयकल्लोळ वाढला आहे. ऑपरेशन टायगरसाठी ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी किमान 6 खासदारांचा स्वतंत्र गट बाहेर पडणे आवश्यक आहे. मुंबईतील तीन खासदार आणि नाशिकचे राजाभाऊ वाझे ठाकरेंसोबत असल्याने 6 ही मॅजिक फिगर पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे तूर्त आपॅरेशन टायगर हे कठीण असल्याचे दिसत आहे.
तृणमुल काँग्रेसच्या 28 पैकी 20 खासदारांनीनॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टीमध्ये विलीन होत, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या तरी केंद्रातील भाजप सरकारचे बळ वाढले आहे, त्यात ठाकरेंचे 9 खासदार केव्हाही भाजपला पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे बेरजेच्या राजकारणाचा विचार केल्यास भाजपकडून ऑपरेशन टायगरला तूर्त बळ मिळणे कठीण आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणता भूकंप होईल हे सांगता येत नाही. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचा विचार करता, लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला तर त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूक असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो या निवडणुकांमध्ये मात्र महायुतीने महाविकास आघाडीचा आणि त्यांच्या घटकपक्षांचा धुव्वा उडवला. विधानसभा निवडणूकीत ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ 20 जागांवर समाधान मानावे लागले, तर गेली अनेक वर्ष ताब्यात असलेली मुंबई महापालिका देखील भाजप-शिवसेना युतीने ताब्यात घेतली. त्यातही उध्दव ठाकरे यांच्याकडे असलेले 9 खासदार ही त्यांची ताकद राहिली आहे. ठाकरेंची दिल्लीतील ही ताकद कमी करण्यासाठी अधुनमधून ऑपरेशन टायगरची चर्चा होत असते. ठाकरेंच्या खासदारांचा एक गट फोडून तो गट शिवसेना शिंदे गटात आणणे म्हणजेच ऑपरेशन टायगर, मात्र हे
ऑपरेशन काही यशस्वी होताना दिसत नाही. त्यातच तृणमुल काँग्रेसच्या 28 पैकी 20 खासदारांनी आपला वेगळा गट करत केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला आहे.
या मोहीमेनंतर राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. सध्याचे राजकीय गोंधळाचे वातावरण बघता त्याच पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना खासदारांची बैठक आयोजित केली होती, या बैठकीला मुंबईतील तीन तर नाशिकचे राजाभाऊ वाझे असे चार प्रत्यक्ष तर उर्वरीत पाच खासदार ऑनलाईन उपस्थित राहिल्याने पुन्हा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदारांचा गट झाला तरच त्या गटाला मान्यता मिळू शकते, अन्यथा खासदारांवर पक्षांतर विरोधी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते. आता ठाकरेंच्या 9खासदारांचा विचार केल्यास मुंबईतील अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय पाटील व नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे हे मातोश्रीशी एकनिष्ठ असल्याचे सध्या तरी दिसत आहे. इतर पाच खासदारांचा विचार केल्यास परभणीचे खासदार संजय जाधव हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत, जगात जर्मनी भारतात परभणी, अशा परभणीत ठाकरे गटाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणूकीत केवळ परभणी या एका महापालिकेत ठाकरे यांचा शिवसेना 65 पैकी 25 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला. परभणीचा राजकीय इतिहास असा सांगतो की जो ठाकरे गटाचा खासदार किंवा आमदार फुटतो तो पुन्हा निवडून येत नाही. इथे ठाकरे हाच ब्रॅन्ड चालतो, ठाकरे गटाचे परभणीतील आमदार डॉ. राहुल पाटील यांना खासदार व्हायचे आहे, त्यामुळे संजय जाधव कधी पक्षांतर करतात याची वाट राहुल पाटील पाहत आहेत. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांची नावे सातत्याने पक्षांतर करणारे तर कधी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तर कधी नॉट रिचेबल म्हणून येत असतात. मात्र काहीही झाले तरी संख्याबळ पुरेसे झाल्याशिवाय
ऑपरेशन टायगर यशस्वी होणार नाही. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबाबत मात्र सध्या साशंकता आहे. वाकचौरे यांनी 2024 ला शिवसेना शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला. त्यामुळे वाकचौरे कधी जातात याची वाट सध्या बबनराव घोलप पाहत आहेत, घोलप यांना डावलून शिवसेना ठाकरे गटाने वाकचौरे यांना उमेदवारी दिली. राजकारणात कधी कोणाला लॉटरी लागेल सांगता येत नाही.
2009 च्या विधानसभा निवडणूकीत मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदार संघातून पराभूत झालेल्या लोखंडेंना 2014 ला शिर्डीचे साईबाबा प्रसन्न झाले, ते 2014 आणि 2019 ला थेट दोनदा खासदार झाले. शिंदे गटाच्या ऑनलाईन हजर राहिलेल्या पाच खासदारांचा विचार केल्यास यातील काही खासदारांचा शिवसेना शिंदे गटात जाण्यापेक्षा भाजपकडे जाण्याकडे कल आहे. कारण भाजप केव्हाही शिवसेनेच्या खासदारांचा गेम करू शकते. 2024 च्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीच्या 2019 च्या विद्यमान खासदार असलेल्या नवनीत राणा यांनी शेवटच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 ला त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेचे आनंदाराव अडसुळ जे 2024 ला लढण्यासाठी इच्छुक होते, त्यांना थंड करत भाजपने नवनीत राणा यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेण्यासाठी राज्यपाल करण्याचे आश्वासन दिले, मात्र अद्याप त्यांना काही राज्यपाल केलेले नाही. त्यामुळे भाजपसोबत जाणे केव्हाही चांगले अशी काही खासदारांची भूमिका आहे. ओमराजे निंबाळकर यांचे नातेवाईक आणि पारंपारिक प्रतिस्पर्धी राणा जगजितसिंह पाटील हे भाजपात असल्याने ओमराजे भाजपात जाण्याची शक्यता कमी आहे.
शिवसेना शिंदे गटाचे 7 खासदार आहेत, अजून 6 खासदारांची जोड मिळाल्यास शिंदेंचे 13 खासदार होऊ शकतात. शिंदेसोबत नवीन 6 खासदार आल्यास या विद्यमान खासदारांना 2029 ला जागा सोडाव्या लागणार, त्यात शिवसेना भाजपाशिवाय किमान लोकसभा निवडणूक लढू शकत नाही. भविष्यात मोठ्या प्रमाणात तडजोडी झाल्यास अनेक खासदारांचा आनंदराव अडसूळ यांच्याप्रमाणे गेम होऊ शकतो. जर ऑपरेशन टायगर यशस्वी झालेच, तर एकनाथ शिंदेचे राज्यातील राजकीय वजन वाढणार. भाजपचे सध्या राज्यात 9 खासदार आहेत, fिशंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांची संख्या 7 वऊन थेट 13 खासदार होणार. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महायुतीतील मित्र असले शिंदे हेच त्यांचे एकमेव राजकीय प्रतिस्पर्धी असल्याची जाणीव मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे शिंदेचे राज्यातील महत्त्व वाढवणे हे राजकीयदृष्ट्या फडणवीस यांच्यासाठी सोयीचे नसणार आहे. त्यात उद्या ठाकरे यांचे 9 खासदार केव्हाही फडणवीस यांच्यासाठी उभे राहू शकतात. त्यामुळे बेरजेचे राजकारण बघता, कोणी कितीही काहीही म्हटले तरी तूर्त आपॅरेशन टायगर यशस्वी होणे कठीण आहे.
प्रवीण काळे