ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानवर आर्थिक दबाव
नौदलप्रमुख त्रिपाठी यांचे महत्त्वाचे वक्तव्य : ऑपरेशन अद्याप जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी मंगळवारी ऑपरेशन सिंदूर दरम्यान सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे पाकिस्तानला झालेल्या नुकसानीचा विस्तृत तपशील सादर केला. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानवर आर्थिक दबाव वाढला आहे, कारण मोठ्या संख्येत व्यापारी जहाजे पाकिस्तानच्या बंदरांवर जाणे टाळत आहेत. तसेच पाकिस्तानला जाणाऱ्या जहाजांच्या विम्याचे शुल्कही वाढले असल्याचे नौदलप्रमुखांनी स्पष्ट केले. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर प्रत्युत्तरादाखल कारवाई केली होती.
मे महिन्यात भारताकडून सुरू करण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर अद्यापही जारी आहे आणि नौदलाने तेव्हापासून आतापर्यंत अभियानात्मक तयारी जारी ठेवली आहे. पाकिस्तानसोबत तणावादरम्यान नौदलाची टेहळणी पश्चिम अरब समुद्रापर्यंत वाढविण्यात आली असल्याचे अॅडमिरल त्रिपाठी यांनी वार्षिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले.
भारतीय नौदलाने पाकिस्तानसोबतच्या तणावानंतर मागील 7-8 महिन्यांमध्ये पश्चिम अरब समुद्रासमवेत अन्य ठिकाणांवर व्यापक प्रमाणात स्वत:च्या युद्धनौका आणि पाणबुड्यांना तत्परतेसह तैनात केले आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय नौदलाची आक्रमक रणनीति आणि कॅरियर बॅटल ग्रूपला त्वरित तैनात करण्यात आल्याने पाकिस्तानी नौदल मकराना किनाऱ्यावर स्वत:च्या बंदरांनजीकच राहण्यास हतबल झाले होते अशी माहिती नौदलप्रमुखांनी दिली आहे. कॅरियर बॅटल ग्रूपमध्ये एक किंवा अधिक विमानवाहू युद्धनौकांसह अन्य युद्धनौका तसेच पाणबुड्या सामील असतात.
युद्धविरामात नौदलाची भूमिका
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय नौदलाची आक्रमक भूमिका पाहून पाकिस्तानला युद्धविरामाची विनंती करणे भाग पडले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान अत्यंत कमी वेळेत 30 हून अधिक युद्धनौका आणि पाणबुड्यांना अभूतपूर्व पद्धतीने तैनात करण्यात आल्याची माहिती वाइस अॅडमिरल के. स्वामिनाथन यांनी दिली.
स्वदेशी आण्विक पाणबुडी
लवकरच स्वदेशी आण्विक बॅलेस्टिक पाणबुडी आयएनएस अरिदमनला लवकरच नौदलात सामील केले जाणार आहे. 2029 पर्यंत राफेल-एमच्या 4 लढाऊ विमानांचा पहिला ताफा प्राप्त होईल अशी नौदलाला अपेक्षा असल्याचे अॅडमिरल त्रिपाठी यांनी सांगितले. याचबरोबर भारतीय नौदल प्रोजेक्ट 75 अंतर्गत 6 अत्याधुनिक पाणबुडींची खरेदी करणार असून याकरता वाटाघाटी सुरू आहेत आणि लवकरच करारावर स्वाक्षरी होऊ शकते अशी माहिती त्यांनी दिली.